ओव्हाळांनी आधी नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा

0

सभागृह नेते एकनाथ पवार यांचे आव्हान : योग्य वेळी शिस्तभंगाची कारवाई

पिंपरी-चिंचवड : महापालिकेची निवडणूक लढविताना कमळाचे चिन्ह स्वीकारावे वाटले. आता भाजपची विचारसणी तुम्हाला मान्य नाही. मग, त्यावेळी कशी मान्य केली असा सवाल उपस्थित करत सभागृह नेते एकनाथ पवार यांनी भाजपशी काडीमोड घेतलेल्या नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांच्यावर टीका केली. तसेच कमळाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचे देखील त्यांनी आव्हान केले.

कमळ चिन्ह का घ्यावेसे वाटले
मूळ आरपीआयएचे कार्यकर्ते असलेले, पण महापालिका निवडणुकीत भाजपच्या कमळावर निवडून आलेले पक्षाचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी मंगळवारी भाजपला सोडचिट्ठी दिली आहे. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, “महापालिका निवडणुकीवेळी निवडून येण्यासाठी कमळाचे चिन्ह घ्यावे वाटले. आता भाजपची विचारसरणी मान्य नाही. तर, ओव्हाळ यांनी अगोदर कमळाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकपदाचा अगोदर राजीनामा द्यावा. प्रभागातून निवडून येऊन दाखवावे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत योग्यवेळी निर्णय घेण्यात येणार आहे.’’