‘ओसरी’ कवितेने डोळ्यात आणलं पाणी

0

भुसावळ। येथील कोटेचा महिला महाविद्यालयात कला, वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. त्यात धरणगावचे कवी प्रा.बी.एन.चौधरी यांनी स्वरचित कविता सादर केल्या. ‘ओसरी या घराची ओस झाली’ या कवितेने विद्यार्थिनींसह रसिकांच्या डोळ्यात पाणी आणले. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा होत्या.

मंचावर जयंतीलाल सुराणा, उपप्राचार्य व्ही.एस.पाटील, प्रा.डॉ.एच.पी.नारखेडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ‘पदम’वार्षिक नियतकालिकेचे प्रकाशन झाले. प्रास्ताविक प्रा.संध्या राजपूत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.आर.एच. पाटील यांनी दिला. आभार प्रा.नीलेश गुरचळ यांनी मानले.साहित्याच्या प्रांतात वेगळा ठसा उमटवणारे धरणगाव येथील डॉ. संजीवकुमार सोनवणे हे आपले गुरू आहेत. त्यांच्या सहवासामुळेच लिखाणाचे बळ मिळाले, अशी कृतज्ञतेची भावना प्रा.चौधरी यांनी व्यक्त केली. ‘वस्तीत माझ्या अंधार आहे, समजू नको ही काळरात्र आहे’, ‘गाव जेव्हा गाव होता, संस्कार व संस्कृती जपत होता’, ‘झिंगलेला बाप करी आकांडतांडव, सोसूनिया जाच तरी ओठ तिचे गप्प’ या कविता लयबद्धपणे सादर करून त्यांनी टाळ्या मिळवल्या. लोककवी इंद्रजित भालेराव यांची ‘उभ्या उभ्या एक दिवस आडराती येऊन जा गं लेकी’ ही कविता प्रा. चौधरींनी आपल्या खास शैलीत सादर केली. त्यात माय-लेकींचा जो संवाद होता, तो विद्यार्थिनींना भावला. गझलकार आबेद शेख यांची ‘ना वाचले ना चाळले त्यांनी मला, बस फक्त त्यांनी चुरगाळले मला’ ही गझल सादर केली.

10 हजार व्यंगचित्रे
विज्ञानाचा शिक्षक असलो तरी मराठी साहित्यावर सुरुवातीपासून प्रेम केले. आर.के.लक्ष्मण, विकास सबनीस यांची 10 हजार व्यंगचित्रे जीवापाड जपून ठेवली आहेत, अशी भावनाही कवी प्रा.चौधरी यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली. ‘मानवतेची जात’, ‘पलिता’, ‘माय’ या तिन्ही कवितांनी उपस्थित रसिकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले. कला, वाङमयीन गोडी जोपासा, असा सल्लाही त्यांनी दिला.