औंध पुलाजवळील कचर्‍यामुळे आरोग्य समस्या

0

औंध : येथील जुना पुलाजवळ टाकल्या जाणार्‍या कचर्‍यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांनीच या भागात कचरा टाकण्यासाठी सांगण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम वाढत आहे.

पर्यावरण संवर्धन समितीच्या (ईसीए) वतीने मागील चार वर्षांपासून शहरात विशेषतः औंध जुन्या पुलाजवळच्या भागामध्ये स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. पुलाजवळ टाकला जाणारा कचरा महापालिकेच्या हद्दीतील आहे. त्याबाबत वेळोवेळी पर्यावरण संवर्धन समितीने महापालिकेच्या आरोग्य विभागास ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. तरीदेखील अद्याप त्यावर कायमस्वरूपी तोडगा महापालिका प्रशासन काढू शकलेले नाही.

ईसीएने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने बुधवारी (दि.16) रात्री पुलाजवळ घनकचरा टाकणार्‍यांना पकडले. त्यामध्ये हॉटेल चालक, मिठाई विक्रेते, वडापाव विक्रेते, नारळ पाणी विक्रेते, शिलाई काम करणारे, केस कापणारे अशा व्यावसायिकांचा समावेश होता. ईसीएच्या कार्यकर्त्यांनी कचरा टाकणार्‍यांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु काही जणांनी पळ काढला तर काही अंधाराचा फायदा घेऊन लपून बसले. त्यांपैकी एकजण ईसीएच्या हाती लागला असून त्याच्याजवळ विचारपूस केली असता त्याने कचरा टाकण्यासाठी औंध परिसरातील आरोग्य अधिकार्‍यांनी ही पर्यायी जागा सुचविल्याचे सांगितले.

महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित अधिकार्‍यांवर योग्य कारवाई व्हावी अशी मागणी पर्यावरण संवर्धन समितीतर्फे करण्यात आली आहे.