औंध । औंध डीपी रोडवरील डॉ. आंबेडकर वसाहतीतील ओम साई गॅस एजन्सीमध्ये अनधिकृतपणे गॅस भरताना स्फोट होऊन दोन जण जखमी झाले. या स्फोटातील मुख्य सूत्रधारांना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे या घटनेत काळ्या बाजाराने गॅस विकणारे, गॅस एजन्सी, संबंधित अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर उपाध्यक्ष रमेश ठोसर यांनी केली आहे. याबाबत चतु:शृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांना पत्रही देण्यात आले आहे.
औंधमध्ये दि.23 नोव्हेंबरला ओम साई गॅस एजन्सीमध्ये बेकायदेशीरपणे घरगुती गॅसमधून लहान दोन ते तीन किलोचे गॅस भरत असताना जोरदार स्फोट होऊन परिसर हादरला होता. यामध्ये दोघांपैकी एक जण गंभीर जखमी झाला होता. याठिकाणी शंभरावर लहान, मोठे गॅस सिलेंडर सापडले होते. ते संबंधित विभागाकडून जप्त करण्यात आलेले आहेत.
याच दुकानात दहा महिन्यांपूर्वी फेब्रुवारीत स्फोट झाला होता. त्यावेळी ठोसर यांनी मुख्य अन्नधान्य वितरण अधिकार्यांना हे दुकान बंद करण्याबाबत पत्र दिले होते. परंतु त्यावेळी कारवाई न झाल्याने पुन्हा स्फोट झाला. औंध विभागाच्या पुरवठा निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी ठोसर यांनी केली आहे. संबंधित ठिकाणचे पोलीस, अन्नधान्य वितरण अधिकारी व कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी नियमित अशा दुकानांना भेटी देत असतात. यातून बरेच अर्थकारण सुरू असल्याची चर्चा आहे. त्यातून हा अनधिकृत व्यवसाय फोफावला असल्यामुळे या लॉबीने शहरासह उपनगरात हातपाय पसरले आहेत.
दहा ते पंधरा दुकाने बंद
औंध, पाषाण, बावधन या परिसरात नोकरी, व्यवसायानिमित्त युवक, युवती राहायला येत असतात. त्यांना हातात धरून नेता येणारे प्रति सिलेंडर चारशे ते पाचशे रुपयांना मिळणारे दोन ते तीन किलोचे सिलेंडर परवडतात. या भागात अशी दहा ते पंधरा दुकाने असून स्फोट झाल्यापासून ती बंद आहेत. परप्रांतीय कामगार महाराष्टातही काम करू शकतात. पण त्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाचा परवाना लागतो. पण परवाना काढला तर कामगारांचा इएसआय व पीपीएफ भरावा लागतो. त्यामुळे कंत्राटदार परवाना काढत नाहीत असेही ठोसर यांनी सांगितले.