जळगाव । राज्यातील 10 महानगर पालिका, 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी आज मतदान झाले. उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. महिन्याभरापासून प्रचाराच्या कामात जुंपलेले नेते आणि कार्यकर्ते आता विश्रांती घेऊ शकतील. त्यांचे भवितव्य किंवा ‘औकात’ गुरुवारी कळणार आहे. तोपर्यंत त्यांना उसंत मिळणार आहे. राज्यातील सर्वाधिक मोठा अर्थसंकल्प असलेली महानगर पालिका म्हणून जिचा लौकिक आहे त्या मुंबईच्या महानगरपालिकेसाठी सर्व प्रमुख पक्षांनी जीवाचे रान केले. 25 वर्षांपासून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये असलेली युती ही मुंबई महानगर पालिकेमुळेच तुटल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना आणि भाजपच्या भांडणात एकमेकांची उणीदुणीच नाही तर एकमेकांची ‘औकात’ देखील काढण्यात आली. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने ही लढाई आपल्या अस्तित्वाची मानली आणि त्याप्रमाणेच या निवडणुकीचा प्रचार झाला. मुंबईमध्ये 52.11 टक्के मतदान झाले. मुंबई महानगरपालिकेतील आजपर्यंतच्या मतदानाचा इतिहास पाहता मतदानाची टक्केवारी फारशी उत्साहवर्धक राहिलेली नाही. तीन वर्षातील मतदानाची 44 टक्केच राहिली आहे. सन 2002च्या निवडणुकीत 43 टक्के, सन 2007 मध्ये 46 टक्के, सन 2012 मध्ये 45 टक्के अशी मतदानाची टक्केवारी होती. पुण्यातही मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसले. पुण्यात 49.52 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी रिक्षावाल्यांनी मतदारांना मोफत सेवाही दिली. पिंपरी चिंचवडमध्ये 51.86 टक्के मतदान झाले. नाशिकमध्ये 52.63 टक्के मतदान झाले. नागपुरात 49.95 टक्के मतदान झाले.
ठाण्यात सर्वाधिक मतदान
मुंबईची सुभेदारी शिवसेनेकडे कोणाकडे राहणार, शिवसेनेचे वर्चस्व कायम राहणार की भाजप बाजी मारणार, ठाण्यातील किल्लेदार कायम राहणार की नव्या सरदारांना संधी मारणार, हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे. राज्यातील हजारो उमेदवारांचे भवितव्य आता मतदान यंत्रांमध्ये बंद झाले आहे. राज्यात आज (मंगळवारी) सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान पार पडले. ठाण्यात सर्वाधिक 53.11 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. ठाण्यापाठोपाठ नाशिकमध्ये 52.63 टक्के मतदान झाले आहे. नागपूरमध्ये 49.95 टक्के, सोलापूरमध्ये 44.00 टक्के, अमरावतीत 51.62 टक्के, अकोल्यात 42.39 टक्के, उल्हासनगरात 46.83 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
शिवसेनेचे महत्त्व वाढले
बारामत । ‘महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील सत्तेत शिवसेनेचं महत्व वाढेल. या निवडणुकीनंतर शिवसेना बॅकफूटवर राहणार नाही.’ असं मत राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं.‘सत्तेत असताना दोन वर्षात शिवसेनेला कायम नमतं घ्यावं लागलं होतं. शिवसेनेनं मंत्रिमंडळात मोठी पदे मागितली. पण भाजपनं शिवसेनेला मोठी मंत्रीपदं दिली नाही. पण आता शिवसेना टोकाची भूमिका घेण्याची शक्यता आहे.’ असं भाकीत अजित पवारांनी वर्तवलं आहे. अजित पवार आज सकाळी बारामती येथील काटेवाडी गावातील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले होते. या वेळी त्यांनी सध्याच्या निवडणुकीच्या निकालावर भाकीत केलं.
जनजागृतीचा सकारात्मक परिणाम
मुंबई, ठाण्यासह दहा महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडले आहे. मतदान वाढावे, यासाठी राज्याच्या निवडणूक यंत्रणेने जनजागृतीच्या सार्या मार्गाचा पुरेपूर अवलंब केला होता. यासोबत अनेक स्वयंसेवी संस्थांनीदेखील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पुढाकार घेतला होता. याचा परिणाम मतदानातून दिसून आला आहे. जिल्हा परिषदांच्या तीन हजार 210 जागांकरिता 17 हजार 331 उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचे भवितव्य आता मतदान यंत्रांमध्ये बंद झाले आहे.
जि.प.,पं.स.च्या 942 जागा
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती या जिल्हा परिषदा, आणि पंचायत समित्या, तसेच गडचिरोलीतील दोन आणि यवतमाळातील सहा जागांबरोबरच पं.स.च्या 16 जागांसाठीही मतदान पार पडले. जि.प.च्या 654 जागांसाठी दोन हजार 956 तर पंचायत समित्यांच्या एक हजार 288 जागांसाठी पाच हजार 167 उमेदवार रिंगणात होते.