औद्यागिक प्रशिक्षण संस्थेच्या स्थलांतराचा प्रश्न कायम

0

सोयगाव। गेल्या तीन वर्षापासून चारकोटी रु खर्चून औद्यागिक प्रशिक्षण संस्थेची इमारत सोयगावला उभारण्यात आली असतांना, तंत्रशिक्षण विभागाने सार्वजनिक विभागाकडून अद्याप या वास्तूचा ताबा घेतलेला नाही, त्यामुळे सोयगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नूतन वास्तूचा नवीन वर्षातही स्थलांतराचा प्रश्न रेंगाळला आहे. शहराबाहेरील प्रशस्त मैदानात जंगलागावा जवळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची नूतन इमारत उभारून तीन वर्ष झाले आहे. परंतु संबंधित विभागाने यामध्ये अनेक त्रुटी ठेवल्याने तंत्रशिक्षण विभाग ही वास्तू ताब्यात घेण्यास नाकारत आहे. दरम्यान,या ठिकाणी थ्री फेज वीजपुरवठ्याचे रोहित्र आवश्यक आहे.

संस्थेचे प्राचार्यांना इमारत तातडीने ताब्यात घेण्याचे पत्र
तंत्रशिक्षण विभागाने गेल्या तीन वर्षापासून रोहित्रासाठी अनामत रक्कम जमा करूनही नवीन वास्तूचा वीजपुरवठ्याचा प्रश्न सुटत नसल्याने वीज आणि पिण्याचे पाणी या मुलभूत प्रश्नामुळे प्रशिक्षण संस्थेचे स्थलांतर अडकले असल्याने वीस वर्षापासून भाड्याच्या इमारतीत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भाडेपोटी नाहक रक्कम भरावी लागत आहे. प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांना इमारत तातडीने ताब्यात घेण्याच्या लेखी पत्र सोमवारी 31 प्राप्त झाले असल्याने रविवार 16 ऑगस्टपासून सुरु होणारी नवीन विद्यार्थ्यांचे वर्ग या नवीन इमारतीत भरविण्याची तयारी तंत्रशिक्षण विभागाकडून हाती घेण्यात आली आहे.

इमारत जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात
वीजपुरवठ्याअभावी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक होणार नसल्याने स्थलांतराचा प्रश्न मोठा गुंतागुंतीचा झालेला आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वादात सोयगाव प्रशिक्षण संस्थेचे स्थलांतरण अडगळीत पडले आहे. सध्या ही इमारत जिल्हाधिकार्‍यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.