औद्योगिकीकरण जीवसृष्टीला घातक!

0

विदर्भ – मराठवाड्यात टेनिस बॉलच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या गारांच्या रूपाने अनेकांवर मृत्यूने घाला घातला. माणसे व पिके उद्ध्वस्त झाली. बीटी, जीएम बियाण्यांचा कापूस, किडीला तोंड देऊ शकत नाही. त्यात बदलत्या तापमान, आर्द्रता इत्यादीमुळे कीड, बुरशीमध्ये अचानक वाढ होऊ शकते. बोंडअळीमुळे कापूस गेला. त्यानंतर डिसेंबरच्या शेवटी पडलेल्या थंडीमुळे तुरीचे पीक फक्त सुमारे 40% आले. आता अवकाळी, बर्फवृष्टी व वेगवान वार्‍यामुळे पिके गेली. जागतिक हवामान संघटनेचा गेल्या वर्षीच्या 23 मार्चचा अहवाल म्हणतो की, बदलत्या हवामानाबाबतचे आमचे आकलन संपले आहे. आपण अज्ञात प्रदेशात प्रवेश केला आहे. त्याआधी वर्षभरापूर्वी या संघटनेच्या अहवालात स्पष्ट केले होते की, ज्याची भीती होती तो वातावरण बदलाचा धोकादायक टप्पा सुरू झाला आहे. पृथ्वीचे सरासरी तापमान दरवर्षी एक पंचमांश अंश सेल्सिअसने वाढू लागले आहे. पर्यावरणीय विभाग दरवर्षी 35 मैल या भीतीदायक गतीने विषुववृत्तापांसून दोन्ही ध्रुवांच्या दिशेने सरकू लागले आहेत. आपल्या देशात या वास्तवाची जाणीव नाही. एकीकडे वातावरणात जीवघेणा बदल होत आहे, तर त्याला कारणीभूत असलेल्या औद्योगिकीकरणाद्वारे महाराष्ट्र व देश बदलण्याच्या वल्गना चालू आहेत. मेक इन इंडिया, स्टार्टअप, मॅग्नेटिक महाराष्ट्र, अशा योजना आणल्या जात आहेत. राजापूर, बाडमेरच्या रिफायनर्‍या, नदीजोडणी, औद्योगिक कॉरिडोर, सागरमाला इत्यादी गोष्टी विकासाच्या नावाखाली राबवण्याचा प्रयत्न होत आहे.

मोटार, वीज व सीमेंट या प्रगतीची चिन्हे मानलेल्या गोष्टी प्रत्यक्षात विनाशाच्या दूत आहेत. पृथ्वीवरील दरवर्षी होणार्‍या 1000 कोटी टन कार्बन उत्सर्जनापैकी सुमारे 750 कोटी टन उत्सर्जनास फक्त मोटार कारण आहे. देशात कोळसा जाळून होणार्‍या वीजनिर्मितीमुळे रोज 23 लाख टन कार्बन डायऑक्साइड वायू वातावरणात सोडला जातो. जेवढ्या वजनाचे सीमेंट बनते त्याच्या अर्ध्या वजनाचा कार्बन डायऑक्साइड वायू वातावरणात वाढतो, अशीच गोष्ट पोलादाबाबत ( स्टील ) आहे. याचा विदर्भ मराठवाड्यातील गारपीट, अवकाळी, वादळे, अतिथंडीने पिके जाण्याशी सरळ संबंध आहे. भूजल घटण्याची, वाढत्या वणव्यांशी, वादळांशी संबंध आहे. सरकारने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकरी मागणी करतो. त्याचवेळी तो या संकटाला आमंत्रण देणार्‍या औद्योगिक शहरी ग्राहकांकडून अधिक भाव मिळावा अशीही अपेक्षा करतो. आधुनिक यंत्राधारित, रसायनाधारित शेती ही औद्योगिकीकरणाचा भाग आहे. त्यातील, रासायनिक खते, कीटक-बुरशीनाशके, बियाणी, वीज, धरणे, बोअरवेल, पंप, ट्रॅक्टर व इतर घटक यांच्यासाठीच्या आर्थिक मदतीबरोबरच त्याचाच परिणाम म्हणून होणार्‍या नैसर्गिक वाटणार्‍या पण मानवनिर्मित असणार्‍या दुर्घटनांच्या नुकसानभरपाईची मागणी एका दमात केली जाते. यामुळे दुष्टचक्र अधिक वेग घेत आहे. नोव्हेंबरमधे बॉन येथे झालेल्या जागतिक परिषदेत, तापमान आता वाढतच राहणार आहे हे जागतिक हवामान संघटनेचे प्रमुख डॉ. पेट्टेरी टलास यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ दुर्घटना वाढत्या क्षेत्रात वाढत्या प्रमाणात व वाढत्या तीव्रतेने होत राहणार आहेत.

कॅलिफोर्नियाच्या वणव्यांबाबत युनोने इशारा दिल्याप्रमाणे येत्या दशकात जगभर कोट्यवधी मानवांचे स्थलांतर सुरू होईल. तापमानवाढीमुळे सागरातील मासळी संपुष्टात येत आहे. पिके दुर्घटनेनंतर काही काळ तरी येत राहतील. पण मासळी कायमची नष्ट होत आहे. आधुनिक उद्योग ही प्रगती, तो जगवतो, हा भ्रम आहे. त्याला कवटाळून राहणे व पृथ्वीच्या सृजनाचा भाग असलेली हजारो वर्षे होत असलेली शेती आज का होत नाही, याचा विचार टाळणे व शेतीपासून दूर जाणे हा मानवजातीचा आत्मघात ठरेल. जेव्हा कुठेही शेती होणार नाही तेव्हा शहरे कशी जगणार? खरा उपाय नेमका उलट आहे. जगातील औद्योगिकीकरण व शहरीकरण तत्काळ थांबवण्याची गरज आहे. नाहीतर वाढते तापमान व आपत्ती मानवजात व जीवसृष्टीचा चालू शतकात क्रमश: अंत घडवतील.

– अ‍ॅड. गिरीश राऊत
9869023127