प्रवाशी सोयी-सुविधांची भुसावळातील अधिकार्यांनी दिली माहिती
भुसावळ- देशभरात विस्तार असलेल्या रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असलातरी खर्चातही दिवसागणिक वाढ होत असल्याने नफ्यात घट होत आहे. रेल्वेला नफ्यात आणण्यासाठी अधिकारी सातत्याने झटत असून यासाठी रेल्वेने खाजगी कंपन्याप्रमाणे व्यावसायीक रुप अंगीकारले आहे. रेल्वेने आता मार्केटिंगला प्राधान्य दिले असून 3 मे रोजी मुंबईत झालेल्या निमा इंडेक्स या प्रदर्शनामध्ये रेल्वेने इतिहासामध्ये प्रथमच आपला स्टॉल लावून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पुढाकार घेतला. प्रवासी सुविधा, मालाची ने-आण, रेल्वेचे उत्पादन याबाबत माहिती देण्यात आली या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या अधिकार्यांना विशेष प्रयत्न करावे लागले.
भुसावळ विभागाचा प्रथमच सहभाग
नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या वतीने 3 ते 5 मे रोजी मुंबईतील गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे पहिल्यांदाच मेगा इंडस्ट्रिअल एक्स्प्रो ‘निमा इंडेक्स 2018’ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक उद्योगांना त्यांचे उत्पादन दाखविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आली. निमाच्या प्रदर्शनामध्ये 17 विविध विभागातील 250 स्टॉल लावण्यात आले होते. विशेष म्हणजे यामध्ये मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने प्रथमच रेल्वेला व्यावसायीक रुप देत इतिहासामध्ये प्रथमच स्टॉल लावून जनतेला रेल्वेच्या सुविधाबाबत माहिती दिली. भुसावळचे डीआरएम आर.के.यादव यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागाचे वाणिज्य विभागीय व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी विशेष प्रयत्न करून रेल्वेकडून स्टॉलसाठी मंजुरी घेतली तर स्टॉलवर भुसावळचे अधिकारी चापोळकर, प्रवीण जंजाळे, कुंदन महापात्रा, जीवन चौधरी यांनी नागरीकांना रेल्वेबाबत माहिती दिली. बदलत्या काळाशी सुसंगत होत रेल्वेने कात टाकली असून या माध्यमातून रेल्वेने महसूल वाढीवरदेखील लक्ष केंद्रीत केले आहे.