औद्योगिक विकासासाठी पॅकेज द्या
उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडून अपेक्षा ः रेल्वे विस्थापीतांचा घरकुल प्रश्नही सुटावा
भुसावळ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पणानिमित्त येत आहेत. दौर्याच्या निमित्ताने शहरवासीयांसह केळी पट्ट्यातील केळी उत्पादकांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. केळी बोर्डाकडून हजारांचा भाव निघत असताना व्यापारी लॉबींगमुळे अवघ्या 200 ते 300 रुपयांमध्ये तिची खरेदी होत असल्याने या प्रकाराला पायबंद लागावा, भुसावळातील रेल्वे विस्थापीतांना तातडीने हक्काचे घरकुल मिळावे, भुसावळच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने भरीव पॅकेज मिळावे तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी मिळण्याची अपेक्षा आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री दौर्यात काय घोषणा करतात? याकडे आता लक्ष लागले आहे.
आज नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
भुसावळ शहरात विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते होत आहे. विशेष म्हणजे डी.एस.ग्राऊंडवर होणार्या कार्यकर्ता मेळाव्यात तब्बल 22 नगरसेवक हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार असल्याने आगामी काळात पालिकेत समीकरणे बदलणार आहेत. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
सरदार पटेल पुतळ्याचे लोकार्पण
उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवार, 17 रोजी दुपारी 12.30 वाजता जुना सातारा भागातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. यावेळी भुसावळ पालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन पवार यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. लोकार्पण सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास उपस्थितीचे देण्याचे आवाहन नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर व मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी केले आहे.
कार्यकर्ता मेळाव्यात जम्बो पदाधिकार्यांचा प्रवेश
शहरातील आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दुपारी एक वाजता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्यात भुसावळ शहर विभागातील पदाधिकार्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. भुसावळ शहरातील 18 विद्यमान तर चार माजी नगरसेवक यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे संकेत आहेत.
यांची मेळाव्यास राहणार उपस्थिती
राष्ट्रवादीच्या मेळाव्यास माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी सभापती अरुणभाई गुजराथी, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी खासदार ईश्वर जैन, माजी पालकमंत्री सतीश अण्णा पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार व पदाधिकारी मोठ्या संख्यंने उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्रभैय्या पाटील, भुसावळ शहराध्यक्ष नितीन धांडे व पदाधिकार्यांनी केले आहे.