नागपूर – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी आपला व्यवसाय बंद केलेला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर आकार/ मागणी आकार पुढील ३ महिन्यांसाठी स्थगित करण्यात येत असून त्यानंतर येणाऱ्या बिलात कोणताही दंड न आकारता तो समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपूर येथे दिली.
लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिलातील स्थिर आकार/मागणी आकार माफ करण्यात यावा, अशी मागणी अनेक औद्योगिक तसेच वाणिज्यिक ग्राहकांनी केली होती. ही मागणी ग्राह्य धरून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
एएमआरमार्फत ज्या ग्राहकांचे मीटर वाचन उपलब्ध असल्यास अशा ग्राहकांना त्यांच्या मीटरवरील नोंदीनुसार वास्तविक बील देण्यात येईल. जर ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध नसल्यास त्या ग्राहकांना सरासरी वीजबिल आकारण्यात येईल. मे-२०२० मध्ये एएमआरमार्फत बिलाची माहिती उपलब्ध झाल्यानंतर वास्तविक मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारण्यात येणार आहे.