‘औरंगजेबाला जे जमले नाही ते सरकारने करून दाखविले’; अमोल कोल्हेंची सरकारवर जहरी टीका !

0

मुंबई: राज्यातील किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) अशा २५ किल्ल्यांची यादी काढण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसेच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाऊ शकतात. ऐतिहासिक पर्यटनस्थळांची प्रसिद्धी लक्षात घेता पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारच्या या निर्णयावर जहरी टीका केली आहे. ‘औरंगजेब यांना जे जमले नाही, ते या सरकारने करून दाखविले आहे.’ अशा शब्दात खासदार कोल्हे यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रातील गड, किल्ले नष्ट करण्याचा प्रयत्न औरंगजेब यांनी केले होते, मात्र त्यालाही ते जमले नव्हते. ते या सरकारने करून दाखविले अशी टीका खासदार कोल्हे यांनी केली आहे.

राज्य मंत्रीमंडळाडून ३ सप्टेंबर रोजी नव्या धोरणाला संमती दिली होती. यानुसार एमटीडीसी राज्य सरकारच्या मालकीचे किल्ले करारावर देऊ शकते. या किल्ल्यांवर फक्त हॉटेलच नाही तर विवाहस्थळ आणि मनोरंजन कार्यक्रमांची जागा म्हणूनही विकसित करण्याचा प्रयत्न होणार आहे.