भुसावळ/धुळे : औरंगाबाद पिशोर पोलिस ठाणे हद्दीतून तेलाची चोरी करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नातील दोघा चोरट्यांच्या धुळे स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून सुमारे एक लाखांच्या तेलासह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शकील रफीक शेख (30, रा.वल्लीपुरा, मौलवीगंज, धुळे) व असलम ईस्माईल खाटीक (35, रा.अंबिका नगर, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
औरंगाबाद ग्रामीणमध्यील पिशोर पोलिस ठाणे हद्दीतील तेलाची चोरी केल्याप्रकरणी 25 फेब्रुवारी 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना धुळ्यातील दोघे पिकअप (क्र.एम.एच.18 ए.ए.5836) मधून चोरी केलेले तेलाचे बॅरल विक्रीसाठी निघाल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून दोघांना रविवारी वडजाई रोड भागातून अटक करण्यात आली. आरोपींकडून एक लाख आठशे रुपये किंमतीचे तेलाचे चार बॅरल, दोन लाखांची बोलेरो मिळून तीन लाख आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, अकेतील दोघा आरोपींनी अन्य तीन साथीदारांच्या मदतीने पिशोर, औरंगाबाद ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतून तेलाची चोरी केल्याची कबुली दिली आहे.तपासासाठी पिशोर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहा.पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, बाळासाहेब सुर्यवंशी, हवालदार रफीक पठाण, नाईक गौतम सपकाळे, राहुल सानप आदींच्या पथकाने केली.