औरंगाबाद : शहरात एकतर्फी प्रेमातून सुखप्रीतसिंग कौर ऊर्फ कशिश प्रीतपालसिंग ग्रंथी (19) या तरुणीचा आरोपी शरणसिंग सेठी (20, रा. भीमपुरा) या तरुणाने शनिवारी भरदिवसा गळा कापून खून केला होता. औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाजवळील रचनाकार कॉलनीत दुपारी दीडच्या सुमारास ही थरारक घटना घडली होती. खुनानंतर आरोपी पसार झाल्यानंतर त्याच्या लासलगावातून मुसक्या आवळण्यात आल्या.
प्रेमाला प्रतिसाद न दिल्याने तरुणीचा खून
उस्मानपुर्यातील आई, वडिल व दोन भावांसह राहणारी सुखप्रितसिंग देवगिरी महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षाला शिकत होती. आरोपी शरणसिंग हा मागील सात ते आठ महिन्यांपासून तिचा पाठलाग करत होता. माझ्याशी मैत्री कर, प्रेम कर असा हट्ट तो करत असे. सुखप्रितसिंगने मात्र त्याला कधीच प्रतिसाद दिला नाही. फार त्रास झाल्यावर तिने घरी सांगितले. तिच्या कुटूंबाने देखील शरणसिंगला समजून सांगितले होते. शनिवारी (21 मे) सुखप्रितसिंग आपल्या दोन मैत्रीणींसह महाविद्यालयात गेली. दुपारी दोन वाजता मैत्रीण दिव्या खटलाणीसोबत ती कॉलेजजवळील रचनाकार कॉलनीतील कॅफेमध्ये गेली. तेथे शरणसिंग आला व त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने सुखप्रितसिंगला कॅफेबाहेर आणले व बळजबरीने ओढून मोकळ्या जागेवर नेले. काहीतरी अघटित घडण्याची शंका आल्याने मैत्रिण दिव्याही त्यांच्या पाठीमागे जात होती. त्याचवेळी शरणसिंगने आपल्याजवळील शस्त्र ‘कृपाण’ काढले व सुखप्रितसिंगच्या गळ्यावर वार केले. काही क्षणात ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. हा प्रकार पाहून दिव्याने आरडाओड केली. स्थानिकांनी धाव घेतली. दिव्याने तिच्या भावाला हा प्रकार सांगितला. पंधरा मिनिटांनी रुग्णवाहिकेतून सुखप्रितला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला.
लासगावातून आवळल्या मुसक्या
हत्या करून पसार झालेल्या आरोपी शरण सिंग सविंदर सिंग शेटी 20) या संशयितास लासलगाव येथील गणेश नगर भागातून त्याच्या बहिणीच्या घरातून नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नाशिकच्या अतिरीक्त पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकाने गुप्तता पाळीत रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही तासातच ताब्यात घेतले. त्यानंतर या आरोपीला औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.