औरंगाबाद : औरंगाबाद शहरात गॅस्ट्रोची लागण झालेले 900 रूग्ण रविवारी आढळले होते. आता ही संख्या 2612 वर पोहोचली असून, रूग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने गॅस्ट्रोची साथ पसरल्याची शक्यता महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केली आहे. ड्रेनेजचे पाणी कुणाच्या चुकीमुळे पसरले, याची चौकशी करू, असे महापौर घोडेले म्हणाले.
सरकारी रुग्णालयातील रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अनेकांना उपचार करुन सोडण्यात येत असून, हजारो रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. औरंगाबादमधल्या छावणी परिसरातून या रोगाची सुरुवात झाली. छावणीतील विविध भागांतील अनेक नागरिकांना मध्यरात्रीनंतर अचानक पोटदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. लहान मुले, महिला-पुरुष, युवक-युवती, ज्येष्ठ अशा सर्वांना या आजाराने वेढले.