औरंगाबाद । औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम् सुरु असताना एमआयएम् गटनेता नासेर सिदीकी, नगरसेविका समीना शेख, नगरसेवक जफर शेख यांनी सभागृह सोडले. वंदे मातरम् संपल्यावर ते सर्व सभागृहात परत आले. यावर प्रसार मध्यमाशी बोलताना समीना शेख, सैयद मतीन यांनी आमचा धर्म मान्यता देत नाही या पुढे आम्ही वंदे मातरम् सुरु असताना बाहेर जाणार असे सांगितले. सारे जहाँ से अच्छा हे गीत घ्या अशी मागणी त्यांनी केली.
यापुर्वीही सभेत गोंधळ
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ’वंदे मातरम्’ म्हणण्यावरुन वाद झाला होता. एमआयएमच्या नगरसेवकांनी ’वंदे मातरम्’ म्हणण्यास विरोध केला होता. यावेळी शिवसेना-भाजपाचे नगरसेवक आक्रमक झाले. एमआयएमचे नगरसेवक व शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांमध्ये राडा देखील झाला तसेच एमआयएमचे नगरसेवक व युतीच्या नगरसेवकांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू करत गोंधळ घातला होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ’ वंदे मातरम्’ सुरू असताना बसून राहिलेल्या एमआयएम व काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना निलंबित करण्यासाठी शिवसेना व भाजपा यांनी आक्रमक पवित्रा घेत सभेत गोंधळ घातला.