औरंगाबाद । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित 8 कोटी 52 लाख रुपयांच्या कर्जवाटप घोटाळ्यात बुधवारी तडकाफडकी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील, संचालक काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, पैठणचे शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांच्यासह 22 संचालक , बँकेचे अधिकारी -कर्मचारी आणि 22 सहकारी सोसायट्यांंविरूद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्यांमुळे सहकारक्षेत्रात खळबळ उडाली आहे.
वर्षभरापासून चौकशी
आर्थिक गुन्हेशाखेकडून मिळालेली माहिती अशी की, बँकेचे माजी संचालक अॅड. सदाशिव गायके यांनी वर्षभरापूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. 2011 ते 2014 या कालावधीत जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने बेकायदेशीर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांना कर्जवाटप केले. ज्या सोसायट्यांना कर्ज वाटप करण्यात आले त्या संचालक मंडळाच्या नातेवाईकांच्या आहेत अथवा त्यांच्या मर्जीतील लोकांच्या असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. तक्रारीची चौकशी वर्षभरापासून आर्थिक गुन्हेशाखा करीत होतीे. एवढेच नव्हे तर त्यांनी हे कर्ज माफही करून टाकल्याचे समोर आले. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना माहिती मिळताच त्यांनी आर्थिक गुन्हेशाखेला गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. गुन्हा दाखल झालेले बहुतेक सर्व आरोपी हे राजकीय क्षेत्रातील आहेत.यामुळे त्यांना कायदेशीर नोटीसा पाठवून हजर होण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी आर्थिक गुन्हेशाखेकडून देण्यात येत आहे. आयुक्तांच्या आदेशाने बुधवारी या नोटीसा पाठविण्याची कार्यवाही सुरु होती.