औरंगाबाद । शहरातील मोतीकारंजा, राजाबाजार, शहागंज, गांधीनगर, चेलीपुरा भागात दंगल उसळते, हे येथील इंटेलिजन्सचे फेल्युअर असून पोलिसांची गोपनीय शाखा भजे खायला गेली होती की हप्ते गोळा करायला गेली होती. शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे हापटाईम तर गुन्हेगार फुलटाईम काम करत असल्याची टीका काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली असून दंगल हे राज्य सरकारचे अपयश असून तेच यास जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या दंगलीची कमिश्नर ऑफ इन्क्वायरी अॅक्टनुसार चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. त्याचबरोबर प्रक्षोभक वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई झालीच पाहिजे, असे विखे पाटील म्हणाले.
शहरातील दंगल ही पूर्वनियोजित होती
विखे पाटील यांनी रविवार शहगंज भागाची पाहाणी केली. नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विखे पाटील म्हणाले, शहरातील दंगल ही पूर्व नियोजित होती. गोपनीय शाखेला ते समजले नाही हा त्यांचा दोष आहे. पोलिसांची गोपनीय शाखा भजे खायला गेली होती की हप्ते गोळा करायला गेली होती. पोलिस अधिकार्यांचा संपूर्ण वेळ हा केवळ सत्ताधारी नेत्यांची हाजी हाजी करण्यातच जात आहे. सत्ताधार्यांच्या सांगण्यावरून पोलिस विरोधी पक्षांच्या नेत्यांची टेहाळणी करत आहेत.
शिवसेनेला टोला लगावताना विखे पाटील म्हणाले, शिवसेनेने सामान्य लोकांच्या सरणावर राजकारण करू नये. शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडणार, असा इशारा देऊन आता द्विशतक उलटले आहे. राज्याला गृहमंत्री नाही, तसेच मागील दोन महिन्यांपासून औरंगाबाद शहराला पोलिस आयुक्त नाही, याचा फायदा गुन्हेगारांनी घेतला आहे. याला राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार असून त्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केली. दरम्यान, औरंगाबादमध्ये उसळलेल्या दंगलीत मोठे नुकसान झाले असून जाळपोळ आणि दगडफेकीत दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर काही पोलिस कर्मचारीही जखमी झाले होते. जखमी झालेले एसीपी गोवर्धन कोळेकर यांची प्रकृती गंभीर आहे.