भुसावळ। येथील बस आगारातून सुटणार्या शिर्डी, नाशिक औरंगाबाद या तीन मार्गांवरील बससेवा प्रवासी संख्या घटल्याने गेल्या तीन दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. उत्पन्न कमी झाल्यामुळे परिवहन महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. प्रवासी संख्या वाढल्यावर पुन्हा बससेवा सुरू केली जाणार आहे. या निर्णयामुळे मात्र या मार्गावर ये- जा करणार्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच खाजगी ट्रॅव्हल्स्ने जादाचे पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे.
महामंडळाला सहन करावा लागत होता तोटा
तसेच भुसावळ बसस्थानकावरून सकाळी सहा वाजता भुसावळ-शिर्डी, सात वाजता नाशिक आणि औरंगाबादसाठी बससेवा होती. पावसाळा सुरू झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. बस प्रवाशांअभावी रिकाम्या धावत असल्याने महामंडळाला तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे या मार्गावरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रवासी वाढल्यानंतर सेवा होणार सुरु
उन्हाळ्याच्या दिवसात या मार्गावर प्रवाशांची गर्दी असल्याने शिर्डी, नाशिक औरंगाबाद बससेवा सुरू झाली होती. पुन्हा प्रवाशांची संख्या वाढल्यानंतर बससेवा सुरू होणार आहे. प्रवाशांची संख्या रोडावल्याने डिझेलचा खर्चही निघणे अवघड झाल्याने महामंडळाने बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.
पावसाचा परिणाम
शहरातून औरंगाबाद, नाशिक व शिर्डी येथे जाणार्या प्रवाशांची संख्या हि मोठ्या प्रमाणावर असते. बर्याच वेळा प्रवाशांना उभे राहण्यासाठी या गाड्यांमध्ये जागा नसते. मात्र पावसाळा सुरु असल्यामुळे प्रवासी संख्येत कमालीची घट झाली असल्याचे एसटी प्रशासनाचे म्हणणे असून संख्या वाढल्यावर पुन्हा बंद करण्यात आलेल्या तिन्ही मार्गावरील बससेवा पुन्हा सुरू होईल. तसेच अन्य काही मार्गांवर लांब पल्यांच्या गाड्या सुरू केल्या जाणार आहेत.