पुणे । महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. तरी या औषधे खरेदी दिरंगाईची आणि यापूर्वी झालेल्या औषधे खरेदीची चौकशी व्हावी अशा मागणीचे निवेदन ’हमारी अपनी पार्टी’च्या वतीने महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांना बुधवारी देण्यात आले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवनकुमार गुप्ता,शहर अध्यक्ष राजेश अग्रवाल,सचिन चव्हाण, सुहास काळे, राजू परदेशी, बी.जे.भंडारी,सुनिल गोयल,संजय ओव्हाळ,बाळासाहेब बिडकर उपस्थित होते.
पुणे महापालिकेत औषधांच्या तुटवड्याबाबत गेले दोन महिने नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत आहेत. शहरी गरीब वैद्यकीय योजनेतील सभासदांबरोबरच अन्य गरीब जनताही महापालिकेच्या दवाखान्यातील उपचारांवर अवलंबून असते. परंतु पालिकेकडे औषधेच उपलब्ध नसल्याने अनेकांना औषधोपचारांविनाच रहावे लागत आहे. यात मधूमेह, रक्तदाब, ह्रदयविकार असे गंभीर विकार असणारेही खूप आहेत. महापालिका दवाखान्यांमधील औषधांच्या तुटवड्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयातून औषधे घ्यावी लागत आहेत किंवा औषधांविनाच रहावे लागत आहे. ही संतापजनक स्थिती आहे.
औषधे खरेदी निविदा प्रक्रिया लांबल्याने ही स्थिती ओढवल्याचे समजते. या लांबलेल्या प्रक्रियेसाठी जबाबदार कोण? त्यांचा शोध घेउन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ’हमारी अपनी पार्टी’ने केली आहे आणि आयुक्तांनी विशेषाधिकार वापरुन तातडीने औषधे खरेदी करावी अशीही मागणी केली आहे.
यापूर्वी औषधे खरेदीत ठराविक लोकांचीच मक्तेदारी झाली होती. त्यातून औषधांच्या मूळ किमतीपेक्षा भरमसाठ रक्कम देउन खरेदी करण्यात येत होती. याबद्दल अनेक स्वयंसेवी संस्थांनी पालिकेचे लक्ष वेधले आहे. तरी त्या औषधे खरेदी घोटाळ्याचीही चौकशी व्हावी अशीही पार्टीची मागणी आहे.