मुंबई । ‘महाराष्ट्र विधी व वैद्यकीय प्रतिनिधी’ (फेडरेशन ऑफ मेडिकल अॅन्ड रिप्रेंझेटटिव्हस असोसिएशन ऑफ इंडिया) या संस्थेतर्फे उद्या मुंबईत वैद्यकीय क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्याकरता भायखळा ते आझाद मैदान दरम्यान महारॅली काढण्यात येणार आहे. यामध्ये औषधांच्या किंमती कमी करण्यासाठी औषधांवरील जीएसटी कर रद्द करण्यात करावा, अशी प्रमुख मागणी असणार आहे. या मोर्चात देशभरातून 10 हजारांहून अधिक औषध विक्रेते व वैद्यकीय प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात जेनेरिक औषधे उपलब्ध करून देत असल्याचे राज्य सरकारने म्हटले होते. परंतु, प्रत्यक्षात जेनेरिक औषध स्वस्त नाहीत. ब्रॅन्डेड जेनेरिक औषधांच्या किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्याजोग्या नाहीत. त्यातच औषधांवर लावण्यात आलेल्या वस्तू व सेवा करांमुळे (जीएसटी)औषधांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, असे या मोर्चाच्या आयोजकांचे म्हणणे आहे.
औषधे जीएसटी करामध्ये आणल्यामुळे सर्वसामान्य गरजू रुग्णांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. इतकेच नाहीतर ऑनलाईन औषधांच्या विक्रीवर बंदी असतानाही सर्रासपणे औषधांची खरेदी-विक्री सुरूच आहे. यावर सरकारचे कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाही. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रात उद्भवणार्या या समस्या सोडण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. औषधांवर जीएसटी लावल्याने निश्चितच किंमती वाढल्या आहेत. या किंमती कमी करण्यासाठी जीएसटी हटवणे आवश्यक आहे. याकरता फेडरेशन ऑफ मेडिकल अॅन्ड रिप्रेंझेटटिव्हस असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने उचललेले पाऊल योग्य आहे, अशी भूमिका मोर्चाला पाठिंबा देणार्या डॉक्टरांचीही आहे.