औषध ऑनलाइन विक्रीला औषध विक्रेत्यांचा विरोध

0

पुणे – अखिल भारतीय औषध विक्रेत्यांच्या संघटनेतर्फे औषधांच्या ऑनलाइन विक्री विरोधात येत्या मंगळवारी (ता. 30) बंद पुकारण्यात आला आहे. राज्यातील 55 हजार औषध विक्रेते यात सहभागी होतील, अशी माहिती राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी मंगळवारी दिली.

अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) काही औषधांच्या ऑनलाइन विक्रीला मान्यता देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले. त्या माध्यमातून डॉक्टरांनी रुग्णाला लिहून दिलेली औषधांची चिठ्ठी अपलोडफ करावी लागणार आहे. त्याला मान्यता दिल्यानंतरच त्या औषधाची विक्री करण्याची यंत्रणा राज्यात उभारली जात आहे. याबाबतचे परिपत्रक राज्यातील सर्व सहआयुक्तांनाही पाठविण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर देशव्यापी औषध विक्री बंद पुकारण्यात आला आहे.

या बंद आंदोलनात पुणे जिल्ह्यातील सात हजार औषध विक्रेते सहभागी होणार आहेत. औषधाच्या दुष्परिणामांपासून सामान्य जनतेला वाचविण्यासाठी यात सहभागी होणार असल्याची माहिती पुणे जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांच्या संघटनेतर्फे देण्यात आली. राज्यात ई-फार्मसीफच्या माध्यमातून बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहे. नार्कोटिक्स ड्रग्ज, गर्भपाताच्या गोळ्या, नशेची औषधे अशांची विक्री या माध्यमातून होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. मात्र प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. सरकार देशभरात ङ्गई-फार्मसीफ, ई-पोर्टल सुरू करण्याच्या योजना आखत आहे. त्याला विरोध करण्यासाठी देशातील व राज्यातील औषध विक्रेत्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.