पिंपरी : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिल्याने एक मुलगी आजारी पडल्याच्या कारणावरुन काळेवाडी येथील एका औषध विक्रेत्याला फोनवरुन पोलीस तक्रार करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी किरण रमेश निकम (वय 32, रा. काळेवाडी) असे धमकावण्यात आलेल्या मेडिकल व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुजारी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) नावाच्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दुकानात असताना बुधवारी तीनच्या सुमारास निकम यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन आरोपी पुजारी याने, मी नवी मुंबई येथून बोलत आहे. तुम्ही एका मुलीला डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय औषध दिल्याने ती मुलगी आजारी पडली आहे. तिच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तुम्ही जर तिच्या रुग्णालयाचा खर्च केला नाही तर मी तुमच्या विरोधात काळेवाडी आणि नवी मुंबई येथील पोलिसात तक्रार दाखल करेन, अशी धमकी दिली. याप्रकरणी पुजारी नावाच्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.