औष्णिक विद्युत प्रकल्पाची राख उचलण्यास बगल

0

ऐतिहासीक वेल्हाळे तलावाचे पहिले पंतप्रधान स्व.जवाहरलाल नेहरूंनी केले होते उद्घाटन ; सात वेळा लेखी आश्‍वासनांना दीपनगर प्रशासनाचा ‘खो’ ; 26 जानेवारीला आंदोलनाचा इशारा

वरणगाव- गेल्या अनेक वर्षापासून ऐतिहासीक वेल्हाळे तलावामध्ये दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पातील राख साचली असून ती काढण्यासाठी वेळोवेळी मागणी करण्यात आली तर तब्बल सात वेळा लेखी आश्वासन देऊनदेखील दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पाने दखल न घेतल्याने जनता मच्छीमार सोसायटी व संयुक्त प्रदूषण निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने 26 जानेवारीला प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी केले तलावाचे उद्घाटन
वेल्हाळे येथील तलाव 1952 मध्ये तयार करण्यात आला. या तलावाचे उद्घाटन करण्यासाठी भारताचे पहिले पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू येथे आले होते. अशा या ऐतिहासिक तलावाची दुरवस्था झाली असून गेल्या अनेक वर्षापासून दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेने हा तलाव भरला आहे. या तलावात जांभूळ व किन्ही नदीतून पाणी येते. सोबतच नदीतदेखील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राची राख असल्याने नद्यादेखील राखेने भरल्या आहेत. तलावासह नदीतील राख काढण्यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली तर औष्णिक विद्युत केंद्राने सात वेळा राख काढण्याबाबत लेखी आश्‍वासन दिले मात्र आश्‍वासनपूर्तीचा विसर पडल्याने आदि जनता मच्छीमार सोसायटी व संयुक्त प्रदूषण निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुख्य अभियंता व प्रांताधिकारी यांना भेटून तत्काळ याबाबत नियोजन करण्याची विनंती करण्यात येणार असून अन्यथा 26 जानेवारीपासून आंदोलन छेडून प्रकल्पाची राग येवू दिली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

तर जलसाठा वाढण्यास होणार मदत
2006 मध्ये पाऊस कमी झाल्याने हा तलाव कोरडा झाला होता. तीच स्थिती या वर्षीदेखील निर्माण झालेली आहे. कमी पावसामुळे तलावात पाणीसाठा नाही यामुळे तलावातील राख उपसा केल्यास पुढील वर्षी होणार्‍या पावसामुळे जलसाठा वाढ होण्यास मदत होईल तसेच जमिनीतील जल पातळी वाढणे देखील मदत होणार आहे.

शेतकर्‍यांसमोर पाण्याचा प्रश्न
या तलावातून 170 शेतकरी पाण्याची उचल करतात तर उर्वरीत फुलगाव, जाडगाव मन्यारखेडा, वेल्हाळे येथील 200 दोनशे शेतकरी पाटचारीच्या माध्यमातून पाणी वाटप संस्थेच्या माध्यमातून पाण्याची उचल करून शेतीतील उत्पन्न घेतात परंतु तलावात जलसाठा नसल्यामुळे शेतकर्‍यांना पिकाची चिंता निर्माण झाली असून परीसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे.

पाणीपुरवठा योजनेवर होणार परिणाम
तलावावरून जाडगाव, मन्यारखेडा, विल्हाळे, खडका, साकरी, मोंढाळा या गावांना पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. आत्ताच हिवाळ्यात जलसाठा नसून येत्या काही दिवसांमध्ये जमिनीतील पाण्याची पातळीदेखील खालावण्याची संकेत निर्माण असून या पाच गावांवर ती पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राख उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा
राखेमुळे निर्माण झालेली समस्या सोडवण्यासाठी प्रकल्पाच्या वतीने ठेके दिले जातात मात्र सदर ठेक्यांंतर्गत काम न करताच पैशांची उचल होते. याकरीता स्वतंत्र स्थापत्य विभागामार्फत उपकार्यकारी अभियंता यांनी भागातील राखेची उचल करून पर्यावरणाची कामे झाली पाहिजे

राग काढण्यासाठी तत्परता दाखवली पाहिजे
तलाव यावर्षी कोरडा झाला असून यातील राख काढणे प्रकल्पाला सहज शक्य आहे. यासाठी कमी कालावधी असून जानेवारी ते मे या महिन्याने पूर्णपणे राख मुक्त तलाव करता येऊ शकतो याबाबत मुख्य अभियंता यांनी तत्परता दाखवली नाही तर आंदोलन छेडणार असल्याचे संयुक्त प्रदूषण निर्मूलन संघर्ष समिती अध्यक्ष संतोष सोनवणे म्हणाले.