मुंबई: अभिनेत्री कंगना रानौत यांनी मुंबईचा पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केली होती, तर रिपब्लिक भारत टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला. या विरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडलेला आहे. सध्या सुरु असलेल्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनात या हक्कभंग प्रस्तावर चर्चा होणे शक्य नसल्याने शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी हक्कभंग प्रस्तावाला पुढील अधिवेशानापर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मांडला. यावरून सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये चांगलीच जुंपली होती. हक्कभंग प्रस्तावाला मुदतवाढ देण्यास माजी मंत्री सुधीर मुंनगटीवार, आमदार अतुल भातखळकर यांनी हरकत घेतली. मंत्री अनिल परब, छगन भुजबळ यांनीही प्रस्तावाचे समर्थन केले.
कंगना रानौत आणि अर्नब गोस्वामी यांनी महाराष्ट्राची बदनामी केली असेल तर त्यांना वेगळ्या पद्धतीने शिक्षा देता येईल मात्र विधीमंडळात हक्कभंग मांडता येणार नाही असे सांगत माजी मंत्री सुधीर मुंनगटीवार यांनी हरकत घेतली. हक्कभंगाची व्याप्ती वाढविल्यास दररोज हजारो हक्कभंग दाखल होतील असे मुंनगटीवार यांनी म्हटले.
विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा असो परंतु हा महाराष्ट्राचा अवमान असल्याचे म्हटले.