जळगाव। शहरातील कंजरवाड्यात पाच जणांच्या टोळक्याने एकाला मारहाण करीत तलवार हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली असून तरूण हा गंभीर जखमी झाल्याने तात्काळ त्याला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तरूणाच्या डोक्यावर गंभीर इजा झाली आहे. कालु गुंड्या माचरे (वय 35 रा.कंजरवाडा, जळगाव) असे जखमी तरूणाचे नाव आहे. शनिवारी सकाळी कालु माचरे हा अंधशाळेच्या प्रवेशद्वाराजवळ बसलेला होता. त्यावेळी पाच जणांचे टोळके त्या ठिकाणे आले.
डोक्याला गंभीर इजा
कुठलीही चौकशी न करता कालु याच्यावर हल्ला चढविला आणि त्याला मारहाण करत तलवाराने त्याच्यावर वार करून गंभीर जखमी केली. दरम्यान, याबाबत जखमी कालु याने दिलेल्या माहितीनुसार पवन भट, संजय मोती, राम गारुंगे, संतोष बागडे व सुनील माटुंगे यांचा शुक्रवारी वहिणी अनिता यांच्याशी वाद झाला होता. त्या वादातूनच या लोकांनी माझ्यावर हल्ला केल्याचे कालु याचे म्हणणे आहे.चार जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली तर एकाने तलवारीने हल्ला करून हल्लेखोरे लागलीच तेथून पसार झाल्याचे कालू याने सांगितले. यातच कालू याच्यावर हल्ला झाल्यानंतर डोक्याला गंभीर इजा होवून रक्तस्त्राव झाला. त्यानंतर त्याला रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.