कंजरवाड्यात जुना वाद उफाळला : दुचाकींची तोडफोड : पोलिसांच्या वाहनाच्या काचा फोडल्या

जळगाव : जुना वाद उफाळून आल्यानंतर दोन गट भिडल्याने शहरातील कंजरवाडा भागात तुफान दगड करण्यात आली. या घटनेत पोलिसांच्या वाहनाच्या काचा फुटल्या तर दुचाकींची तोडफोड करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली. या दगडफेकीमुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. एमआयडीसी पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहचत परीस्थिती नियंत्रणात आणली.

जुना वाद उफाळला
गत महिन्यात राम नवमीच्या दिवशी सम्राट कॉलनीमध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूकी दरम्यान दिव्यकांत बागडे या युवकाला लक्ष्मी नगरातील तीन ते चार तरुणांनी मारहाण केली होती. त्यानंतर मुलाला का मारले ? याचा जाब विचारण्यास गेलेल्या दिव्यकांत याच्या आईलादेखील तरुणांनी मारहाण केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल होता. मंगळवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास लक्ष्मी नगरातील काही तरुण कंजरवाडा येथे दुचाकीने आल्यानंतर त्यांचा कंजरवाडा भागातील तरुणांशी वाद झाला व नंतर दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. या घटनेत चार ते पाच दुचाकींची तोडफोड करण्यात आली.

पोलिसांच्या वाहनावर दगडफेक
कंजरवाड्यात दगडफेक सुरू असल्याची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात असलेले पोलिस कर्मचारी नाना तायडे व रमेश अहिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु जमाव अधिक आक्रमक असल्याने त्यांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केल्याने पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले. गत महिन्यात तांबापुरा परीसरात याच वाहनावर काही तरुणांनी दगड मारून नुकसान केल्यानंतर पुन्हा याच वाहनाचे नुकसान झाले.

संशयीतांची रात्री उशिरापर्यंत धरपकड
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस, एसआरपीएफ, क्यूआरटीच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. नंतर जमावाला पिटाळून लावण्यात आले. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड हे घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेमुळे कंजरवाडा परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून संशयितांना ताब्यात घेण्याचे काम सुरू होते.

जमावाविरोधात पोलिसात गुन्हा
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या घटनेत एकाने कंजरवाड्यातील तरुणावर चॉपरने हल्ला केला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच वादातून ही घटना घडल्याचे समजते. पोलिसांनी घटनास्थळावरून नुकसानग्रस्त वाहने ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत कंजरवाडा भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला तर रात्री उशिरा एमआयडीसी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.