कंटेनरखाली चिरडून मायलेकी जागीच ठार

0

जळगाव । नातेवाईकांना भेटून जळगावकडे येत असतांना पाळधीजवळ आलेल्या एकलग्न गावाच्या पुढे मागून येणार्‍या भरधाव कन्टेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुकाचीवरील तिघेजण रोडवर पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास घडली असून जखमीस शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले तर मयत झालेल्या माय लेकींचा मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेनासाठी दाखल करण्यात आले.

पोलीसांची पाऊण तास दिरंगाई
अपघातात दोघी मायलेकी मयत झाल्याचे ठिकाणीच जखमी झालेले सुकदेव पाटील त्यांच्या मृतदेहाजवळच होते. अचानक झालेल्या घटनेमुळे ते भानावर नव्हते आणि जागेवरून उठताही येत नव्हते. अपघात झाल्यानंतर एकलग्न गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून सुरूवातील जखमी झालेले सुकदेव पाटील यांना रिक्षात बसवून जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झाल्याचे पाहून मुलगा कल्पेशने त्यांना तातडीने आकाशवाणी चौकातील गणपती रूग्णालयात दाखल केले. संगिता पाटील आणि प्रांजल पाटील यांचा मृतदेह 108 क्रमांच्या वाहनाने जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. दरम्यान, पाळधी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरवर अपघात होवून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती पाळधी पोलीसांना कळविल्यानंतरही पोलीस अधिकारी पाऊण तासानंतर घटनस्थळी हजर झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरीकांनी सांगितले.

नातेवाईकांचा आक्रोश
एकलग्न गावाजवळ अपघात झाल्यानंतर दोघ मयतांची मृतदेह जिल्हा सामन्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले होते. अपघाताची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर जिल्हा रूग्णालयात एकच धाव घेतली. महिलांसह नातेवाईकांनी गर्दी जमवून हंबरडा फोडला होता. यावेळी मयत प्रांजल पाटील हीच्या मैत्रीणीसह परीसरात राहणार्‍या रहिवाश्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

एकलग्नच्या गावकर्‍यांची घटनास्थळी धाव
सुकदेव ओंकार पाटील (राजपूर) (वय-50) रा. एकनाथनगर रामेश्‍वर कॉलनी यांची मुलगी प्रांजल (काजल) सुकदेव पाटील (वय-23) ही पारोळा तालुक्यातील कामतवाडी येथे राहणार्‍या साडूच्या घरी आठवड्यापासून राहत असल्याने तिला घेण्यासाठी सुकदेव पाटीलसह पत्नी संगिता सुकदेव पाटील (वय-43) यांच्या सोबत दुचाकीने सोमवारी दुपारी दुचाकीने गेले. रात्री नातेवाईकांसोबत गप्पा गोष्टी झाल्यानंतर सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास जळगावकडे येण्यासाठी सुकदेव ओंकार पाटील, पत्नी संगिता सुकदेव पाटील आणि मुलगी प्रांजल सुकदेव पाटील हे मोटारसायकल क्र. (एमएम 19 बीडी 7887) ने एरंडोल मार्गे जळगावकडे येण्यासाठी निघाले. धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावाजवळ दुचाकीला मागून येणार्‍या भरधाव कंन्टेनरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या संगिता पाटील आणि प्रांजल पाटील या महामार्गाच्या रोडवर तर सुकदेव पाटील हे रोडच्या मोकळ्या जागेवर पडले. ज्यावेळी दोन्ही माय-लेकी रोडवर पडल्या त्याचवेळी धडक दिलेल्या कंटेनरच्या मागच्या चाकात आल्याने दोघांच्या डोक्याचा चेंदामेंदा होवून दोघी जागीच ठार झाल्या तर सुकदेव पाटील हे गंभीर जखमी झाले. घटना घडल्यानंतर एकलग्न गावातील गावकर्‍यांनी क्षणाचाही विलंभ न करता मदतीसाठी धाव घेतली.

शिक्षणानंतर मुलीच्या लग्नाची होती तयारी
मयत प्रांजल सुकदेव पाटील ही शहरातील बेंडाळे महाविद्यालयात एम.कॉम.च्या शेवटच्या वर्षाला होती. नुकतेच प्रांजलने एम.कॉम.ची शेवटच्या वर्षाची परिक्षा दिली होती. महाविद्यालयाला सुटी असल्याने पारोळा तालुक्यातील कामतवाडी येथे राहणार्‍या मावशीकडे गेल्या आठवड्यापासून रहायला गेली होती. गेल्या पंधरा ते विस वर्षापासून कोणतेही शुभकार्य घरात झालेले नव्हते. मुलीच्या लग्नासाठी मुलगा शोधण्याचे काम करत होते. शिक्षणानंतर मुलीचे लग्न पाहण्याचा कार्यक्रम असल्याने प्रांजलचे आई संगिता पाटील आणि वडील सुकदेव पाटील हे दुचाकीवर कामतवाडी येथे आले होते. मंगळवारी सकाळी घराकडे परतत असतांना ही घटना घडली.

मुळ गावाला होणार अंत्यसंस्कार
पाटील कुटुंबिय हे पाचोरा तालुक्यातील बारापुलाचे वडगाव येथील रहिवाशी असून ते गेल्या विस वर्षापासून ते जळगाव येथील रामेश्‍वर कॉलनीत स्थायीक झाले होते. मिळेल ते काम करण्यासाठी कुटुंबियांची तयारी असायची तर ज्या भागात रहायचे त्या भागात सर्वांशी मनमिळावू पद्धतीने राहत होते. अपघाताची वार्ता कळाल्यानंतर गावाकडील नातेवाईकांनी जळगावकडे धाव घेतली. मात्र सुकदेव पाटील यांचे मुळ गाव वडगाव ता.पाचोरा येथे असल्याने शवविच्छेदन करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

पापड उद्योगातून कुटुंबाचा उदरनिर्वाह
सुकदेव पाटील आणि संगिता पाटील हे कुटुंबिय गेल्या 20 वर्षांपासून रामेश्‍वर कॉलनीमध्ये राहत होते. वर्षभरापुर्वी त्यांनी स्वतःचे घर बांधले होते. आता घराला रंगकाम देण्याचे काम सुरू होते. दरम्यान, पाटील कुंटूबिय हे मध्यमवर्गीय होते. त्यामुळे संसाराचा गाडा हाकण्यासाठी संगिताबाई हे मोठ्या प्रमाणावर मदत करत होत्या. त्या परीसरात बजरंग पापड उद्योगासाठी पापड बनविण्याचे काम करत होत्या. तर मुलगा कल्पेश पाटील हा शिक्षणासह आरटीओ कार्यालयात एजंट म्हणून काम करत आहे. तर सुकदेव पाटील हे खासगी सेक्यूरीटी म्हणून गेल्या दिड महिन्यापासून सारस्वत बँकेत काम करत आहे.