चाकण : समोरून भरधाव येणार्या भरधाव कंटेनरने कारला धडक दिल्याने कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात चाकण-शिक्रापूर रस्त्यावर साबळेवाडी येथील धोकादायक वळणावर बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडला. हेमंत दिलीप पाषाणकर (वय 30) व बाळू मच्छिंद्र चव्हाण (दोघेही रा. थेरगाव, ता. हवेली, जि. पुणे) अशी या अपघातात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. या अपघात प्रकरणी कंटेनर चालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घाटातील वळणामुळे अपघात
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शिक्रापूरहून चाकणकडे भरधाव जाणार्या (एमएच 46 एच 5474) क्रमांकाच्या कंटेनरने समोरून येणार्या (एचएम 12 वायए 1186) क्रमांकाच्या कारला जोरात धडक दिली. साबळेवाडी येथील घाटात असलेल्या वळणावर हा अपघात झाला. या अपघातात कारमधील हेमंत पाषाणकर व बाळू चव्हाण हे गंभीर जखमी झाले. तसेच, कारचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.
दोघे कारमध्ये अडकले
कंटेनरने जोरात धडक दिल्याने कारचा समोरील भाग पूर्णपणे आत चेपला गेला. त्यामुळे हेमंत व बाळू हे दोघेही गंभीर जखमी होऊन कारमध्येच अडकून पडले.अपघातानंतर कंटेनरचालक पळून गेला. अपघाताची माहिती झाल्यानंतर चाकण पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने कारमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. दोन्ही जखमींवर चाकण येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मुश्ताक शेख, अशोक साळुंके करीत आहेत.