इलेक्ट्रीक पोलवरील वायर्स पालिका सोमवारपासून हटवणार
भुसावळ- पालिकेच्या यावल रोडवरील पथदिव्यांवरून गेेलेली केबल कंटेनरमध्ये अडकल्याने पालिकेच्या पथदिव्याचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर शहर वाहतूक शाखेच्या वाहतूक पोलिसांनी कंटेनर बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली. पालिकेच्या अधिकार्यांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी कंटेनर चालकाकडे भरपाईची मागणी केली मात्र त्याच्याकडे जेवणासही पैसे नसल्याने संबंधित कंटेनर चालक काम करीत असलेल्या मालकाचा पत्ता व संपर्क क्रमांक घेवून कंटेनर सोडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
कंटेनरमध्ये अडकली केबल
यावलकडून भुसावळकडे येणारा कंटेनर (क्र.जी.जे.06 वाय.वाय.4957) सेंट अलॉयसीस हायस्कूलसमोरून वळण घेत असताना पालिकेच्या पथदिव्यांवरून गेलेली केबल कंटेनरमध्ये अडकल्याने पथदिव्याचा खांब जमिनीबाहेर आल्याने पालिकेचे नुकसान झाले तर केबल वायर्सदेखील ठिकठिकाणी त्यामुळे तुटल्या. पालिकेचे इलेक्ट्रीक इंजिनिअर सुरज नारखेडे व पालिकेचे लेखापाल अख्तर खान आदींनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणली. संबंधित केबल वायर्स चालकाकडून हा दंड आता पालिका वसूल करणार असून त्याबाबत नोटीसदेखील बजावली जाणार आहे शिवाय त्याबाबतचा खर्च संबंधिताकडून वसुल करणार असल्याचे तसेच कंटेनर मालकालाही नोटीस बजावली जाणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.