लोणावळा । पुण्याकडून भरधाव वेगात मुंबईकडे ‘एक्सप्रेस-वे’वरून जाणार्या ट्रक, दोन कंटेनर व मोटारींचा आडोशी पूलावर विचित्र अपघात झाला. यामध्ये ट्रक व कंटेनर पुलावरून आडोशी मार्गावर कोसळले, तर मोटार रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. यामध्ये चालक गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात सकाळी सहादरम्यान घडला.
कंटेनर चालकाचा ताबा सुटला
शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास ‘एक्सप्रेस-वे’वरून पुण्याहून मुंबईकडे जाणार्या कंटेनर (एमएच 46 एएफ 5577) वरील चालकाचा ताबा सुटला आणि तो पुढे असणार्या मोटारीवर (एमएच12 केवाय 2908) आदळला. यामध्ये मोटार बाजूला फेकली गेली. यानंतर हा कंटेनर पुढे असणार्या दुसर्या ट्रेलरला (एमएच बीजी 2095) याला धडकला. त्यांच्याही मागून भरधाव वेगात ओव्हरटेक करून आणखी एक ट्रक (एमएच 46 बीजी 3498) येत होता. त्यालाही कंटेनरची जोरदार धडक बसली. यामुळे आडोशी पुलावरून कंटेनर व ट्रक दोन्ही सोबत खाली कोसळले, अशी माहिती अपघातातील मोटार चालक सागर हनुमंत महामुनी यांनी माहिती पोलिसाना दिली. अपघातातची माहिती मिळताच स्थानिक तरुण ,खोपोलीतील अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय ग्रुप मधील सामाजिक कार्यकर्ते व खोपोली पोलिस निरीक्षक राजन जगताप यांच्या आदेशानुसार सह्य पो.नि. श्रीरंग किसवे यांनी सहकारी वर्गासह घटनास्थळी भेट देवून रस्त्यामध्ये असणार्या दोन्ही वाहनांना बाजूला केले. या दरम्यान एक्सप्रेस-वे वरील वाहतूकीची काहीवेळासाठी कोंडी झाली होती.