कंडारीकरांच्या सतर्कतेने गुरे चोरटा जाळ्यात

भुसावळ : तालुक्यातील कंडारी ग्रामस्थांच्या सतर्कतमुळे मंगळवारी मध्यरात्री गुरे चोरीचा प्रयत्न फसला असून पोलीस व ग्रामस्थांनी केलेल्या पाठलागानंतर एका गुरे चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले तर अन्य तिघे पसार होण्यात यशस्वी झाले. दरम्यान, चोरटे व पोलिसांच्या पाठशिवणीच्या खेळात वाहनातून गाय पडल्याने जखमी झाले तर काही अंतरावर चोरट्यांचे वाहन पंक्चर झाल्यानंतर चोरट्यांनी वाहन सोडत पळ काढला. या वाहनातील तीन जखमी गुरांची पोलिसांनी सुटका केली असून गो प्रेमींनी त्यांच्यावर उपचार केले आहे. चौघा गुरे चोरट्यांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कंडारी ग्रामस्थांच्या सतर्कतेचे कौतुक
मंगळवारी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास कंडारी येथे गुरे चोरणारी टोळी आल्याची माहिती ग्रामस्थांना कळताच त्यांनी अन्य ग्रामस्थांना जागवत सापळा रचला तसेच शहर पोलिसांना माहिती दिली. सहायक फौजदार संजय कंखरे, रसीद तडवी, चंद्रशेखर गाडगीळ यांच्यासह पोलिस कर्मचारी कंडारीकडे येत असताना त्यांनी समोरून येणार्‍या झायलो गाडी (एम.एच 12 जी.झेड. 1090) ला थांबण्याचा इशारा केला मात्र झायलो कार चालकाने शहर पोलिस ठाण्याच्या सरकारी गाडीला (एम.एच.19 एम. 632) धडक देत पळ काढला व यावेळी पोलीस कर्मचारी बचावले. चोरट्यांची झायलो डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून जात असताना गाडीतील एक गाय रक्तबंबाळ होवून खाली पडली. गो रक्षक रोहित महाले यांनी गायीवर उपचार केले. गाडीतून पडलेली ही गाय कंडारी येथील अनिता इंगळे यांच्या मालकीची गाय असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी भेट देऊन पाहणी केली.

पीओएच परीसरातच झायलो वाहन सापडले
गुरे चोरट्यांची झायलो पंक्चर झाल्याने त्यांनी पीओएच परीसरातच वाहन सोडून पळ काढला. बुधवारी सकाळी बाजूला असलेल्या मारोती मंदीरात पुजारी आल्यावर त्यांना रक्ताने भरलेली गाडी दिसताच त्यांनी पोलिसांना माहिती दिल्याने पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुणगहू हे पोलिस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गाडीत तीन गुरे रक्ताने माखलेली व पाय मोडलेल्या अवस्थेत मिळाल्यानंतर त्यांनी गुरांची सुटका केली.

पोलिसात गुन्हा दाखल
गुरे चोरी प्रकरणी सहा.फौजदार संजय कंखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हारून शहा भिकन शहा (रा.पिंप्राळा हुडको जळगाव), अशपाक शेख (रा.पिंप्राळा, जळगाव), आमीन शेख उर्फ आमीन चुहा (रा.धुळे) आणि बबल्या शेख (रा. धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरे चोरी प्रकरणी एका संशयीतास अटक करण्यात आली असून तीन संशयीतांचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला.