उपद्रवींना कायद्याचा बडगा दाखवणार -पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांची ग्रामस्थांना ग्वाही
भुसावळ- तालुक्यातील कंडारी येथील वादाचे पडसाद सलग चार दिवसांपासून कायम उमटत असून बुधवारी रात्री जमावाने बुलेट पेटवून तुफान दगडफेक केल्यानंतर गुरुवारीदेखील अज्ञात जमावाने शाळकरी विद्यार्थ्यांना मारहाण करीत धुडगूस घातल्याने कंडारीकरांमध्ये भीती पसरली आहे. उपद्रवींनी कायदा-सुव्यवसस्था बासनात टाकली असून गुन्हेगारांना धाक वाटेल, अशी कुठलीही कृती होत नसल्याने त्यांचे फावले आहे. दरम्यान, पोलिसांनी बुधवारच्या घटनेप्रकरणी अज्ञात जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे तर गुरुवारच्या घटनेनंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी गावात बैठक घेत शांतता राखण्याचे आवाहन केले तसेच कायदा हातात घेणार्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही दिला.
जाब विचारल्याने मारहाण
दुचाकीच्या उजेड चेहर्यावर पडल्यानंतर त्याचा जाब विचारल्याने दोघा युवकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्री 11 वाजता घडली होती तर त्यानंतर अज्ञात जमावाने भांडणाचा जाब विचारणार्या विशाल आत्माराम मोरे (27) यांच्या घराची तोडफोड करीत त्यांच्या आई सुमनबाई मोरे (59) यांना मारहाण केली होती. ही घटना ताजी असतानाच 23 रोजी रात्री कंडारी प्लॉटमधील मनोज बिअर बारसमोर संजय मुरलीधर मोरे यांच्या मालकिची बुलेट पेटवून दिल्याने गावात खळबळ उडाली तसेच या घटनेपूर्वी या भागात दगडफेकही झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी धाव घेत शांतता प्रस्थापीत केली.
बुलेट जाळल्याने 90 हजारांचे नुकसान
संजय मुरलीधर मोरे (नागसेन कॉलनी, कंडारी) यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्ससमोर त्यांची बुलेट (एमएक्सक्यू 2852) लावली असताना 50 ते 60 जणांच्या अज्ञात जमावाने हातात लाठ्या-काठ्या, लोखंडी पाईप, दगड-विटा घेवून एकमेकांसमोर आले व संदीप सिंगारेचा भाचा गोलू (पूर्ण नाव, गाव माहित नाही) व त्याच्या साथीदारांनी बुलेट पेटवून दिल्याने सुमारे 90 हजारांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
विद्यार्थ्यांना मारहाणीने घबराट
बुधवारी रात्रीच्या अप्रिय घटनेनंतर पोलिसांनी बंदोबस्त लावला खरा मात्र अज्ञात जमावाने शाळकरी विद्यार्थ्यांना गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास टार्गेट करीत त्यांच्यावर दगडफेक करून मारहाण केली. या घटनेत चेतन पाटील (8) या विद्यार्थ्याचे डोके फुटले तर अनेकांना मुका मार बसला. या घटनेची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी धाव घेत वातावरण निवळले.
कायदा हातात घेतल्यास गय नाही- राठोड
कंडारीतील महर्षि वाल्मीक मंदिरात पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी बैठक घेत शांतता राखण्याचे आवाहन केले तसेच कायदा हातात घेणार्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही दिला. लोकप्रतिनिधींनी गाव शांत राखण्याकामी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पंचायत समितीचे माजी सदस्य संतोष निसाळकर यांनी पोलिस खोलवर तपास करीत नसल्याची खंत व्यक्त केली तर काही महिलांनी उपद्रवी महिलांवरच हात उचलत असल्याने त्या सुरक्षित नसल्याची भावना मांडली. सुषमाबाई मोरे यांनीदेखील आपल्या मुलांचा दोष नसताना मारहाण झाल्याचे सांगत कुटुंब सुरक्षित नसल्याचे सांगितले.