कंडारीतील विवाहितेला फिनाईल पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

0

पतीसह सासुविरूद्ध शहर पोलिसात गुन्हा ; पतीविषयी विचारणा केल्याने सासुचा संताप

भुसावळ- तालुक्यातील कंडारी प्लॉट भागातील 28 वर्षीय विवाहितेने पती कुठे गेला? याबाबत सासुला विचारणा केल्यानंतर सासुने सुनेलाच फिनाईल पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवार, 7 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रेल्वेत नोकरीस असलेल्या पतीसह सासुविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीबाबत विचारणा केल्याने पाजले फिनाईल
कंडारी प्लॉट, रेल्वे नाथ कॉलनीतील रहिवासी असलेल्या सपना रमेश देवरे (28) या विवाहितेने शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार तिचा पती रूपेश प्रेमनाथ देवरे हा दुसर्‍या महिलेसोबत निघून गेल्यानंतर सासु लताबाई प्रेमनाथ देवरे यांना पती कुठे आहे? याबाबत विचारणा केली असता सासुला राग आल्याने तिने चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत आज तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत घरातील हार्पिक (फिनाईल) पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पती रूपेश देवरे व सासु लताबाई देवरे यांच्याविरुद्ध हवालदार मोहम्मद अली सैय्यद यांनी भादंवि 307, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे करीत आहेत. दरम्यान, विवाहितेची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले तर अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.