मंदिरावर आकर्षक रोशनाई ; महादेव अभिषेकाने यात्रोत्सवास प्रारंभ
भुसावळ- तालुक्यातील कंडारी येथे मकरसंक्रांतीच्या पर्वावर होणारा श्री कपिलेश्वर महादेव मंदिराचा यात्रोत्सव मंगळवार, 15 रोजी होत आहे. यानिमित्त तयारी पूर्ण झाली असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कपिलेश्वर मंदिरास रंगरंगोटीसह विद्युत रोषणाई करण्यात आली तसेच आकाश पाळणेदेखील दाखल झाले आहेत. सोमवारी सकाळी महादेवाचा वैद्दीक मंत्रोपच्चारात अभिषेक करण्यात येऊन यात्रोत्सवाच्या पर्वास प्रारंभ झाला.
महर्षि कपिल मुनींमुळे गावाची ओळख
तापी नदी काठावर वसलेल्या कंडारी गावाला धार्मिकदृष्ट्या महत्वाचे स्थान आहे. महर्षी कपिल मुनींनी या ठिकाणी तपश्चर्या केल्याचा उल्लेख पुराणांमध्ये मिळतो. कपिल मुनी यांनी या ठिकाणी राहून त्यांच्या आईला उपदेश दिला. कपिल मुनी यांच्या नावावरून या मंदिराचे नाव कपिलेश्वर महादेव मंदिर असे पडले आहे. या गावाचे नाव पूर्वी कर्दनी असे होते. या नावाचा अपभ्रंश होऊन कंडारी या नावाने ओळखले जाते. या कपिलेश्वर मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असून आतील गाभारा हा पूर्वी तीन ते साडे तीन फुट खोल असा होता. त्या ठिकाणी स्वयंभू अशी वाळूची शिवलिंग आहे. याठिकाणी जिल्हाभरातून भाविक दर्शनासाठी येऊन आपले नवस मानतात, तसेच मानलेले नवस पुर्ण करण्यासाठी येत असतात.
वैदिक मंत्रोपच्चाारात अभिषेक
प्राचीन काळापासून मकरसंक्रांतीनिमित्त येथे यात्रोत्सव साजरा होतो. यात्रेनिमित्त महाभिषेक, महायज्ञ करण्यात येवून महाप्रसाद वाटप करण्यात येतो. सुमारे 500 वर्षापासून असलेल्या या परंपरेची एक आख्यायीका असून आजतागायत येथील ग्रामस्थांनी ती जपली आहे. दरवर्षी यात्रोत्सवाच्या दिवशी पहाटे पाच वाजता एका जोडप्याच्या हस्ते महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यात येतो. यावर्षी सचिन चौधरी यांच्याहस्ते सपत्नीक अभिषेक करण्यात आला. निलेश कुळकर्णी यांनी पौरोहित्य केले. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष गोकुळ मोरे, काशिनाथ महाजन, मुरलीधर जेठवे, धनसिंग जेठवे, चावदस मोरे, शंकर मोरे, संजू झोपे, मोहन चौधरी, गोपी पाटील, मदन पाटील आदी उपस्थित होते.
मानाच्या पूजेची परंपरा कायम
संक्रांतीच्या पुण्यकाळात सकाळच्या ब्रह्ममुहूर्तापासूनच महादेवाचे दर्शन घेण्यासाठी परीसरातील व बाहेरगावाहून भाविक येत असतात. मंदिरात संक्रांतीनिमित्त गावातील राजपूतवाडा, महाजन वाडा व कोळीवाड्यामधून भाविक मानपूजा घेवून जातात. त्यात प्रामुख्याने ही मानाची पूजा पूर्व परंपरेपासून महाजन वाड्यातील मधुकर त्र्यंबक महाजन यांच्या पुढाकाराने 2014 या वर्षापर्यंत चालत आलेली होती. गावातील सर्व देवी, देवता, वीर, मुंजांना व बाण्यांना मानपूजा देण्यासाठी सकाळी आठ वाजता वाड्यातील सर्व सत्पंथी अनुयायी स्त्री, पुरुष, तरुण, वृध्दमंडळी महाजन वाड्यात एकत्रित जमा होऊन येथूनच प्रथम मानाची पूजना देण्यास सुरुवात होते. गावातील विठ्ठल मंदिर, बेहरमबुआ, हनुमान मंदिर, ऐस देव, वाल्मिक मंदिर, सप्तश्रृंगी मंदिर, कपिलेश्वर महादेव येथे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करुन सोबत आणलेली पूजा व भगवा ध्वज चढविला जातो. गावातील नागरिक व भक्तगण यात्रेला येतात. त्रिवेणी संगमावर आंघोळ करून कपिलेश्वराचे दर्शनाने पुण्यफल प्राप्त होते अशी आख्यायिका आहे . या ठिकाणी त्रिपिंडी, कालसर्प पूजा, ग्रहशांती, अभिषेक आदी पूजा व कर्मविधी केल्या जातात.
आकाश पाळण्यांसह खेळणी दुकाने थाटली
दरवर्षी मकर संक्रातीला कपिलेश्वर महादेव मंदिराची यात्रा भरत असते. मंदिराच्या परिसरात नदीकाठी खेळणी, गृहोपयोगी वस्तू तसेच खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडून विविध दुकाने थाटण्यात येत असून यात्रेकरी भाविकांच्या मनोरंजनासाठी मोठ मोठी आकाश पाळणे देखील दाखल झाली आहेत. यात्रेसाठी मंदिर परिसरात विविध खेळण्याची व नारळ, रेवडी, साखर फुटाणे, बेल, फुलहार, पूजा साहित्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. उंच उंच झोके, आकाश पाळणे यासह विविध मनोरंजनात्मक खेळाची व खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली असून ग्रामस्थांमध्ये यात्रोत्सवामुळे चैतन्य निर्माण झाले आहे.