कंडारीत ग्रामपंचायत सदस्याच्या घरासमोरच अस्वच्छता

0

गावातील अस्वच्छतेने नागरीकांचे आरोग्य धोक्यात : ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

भुसावळ- तालुक्यातील कंडारी गावात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर ग्रामपंचायत सदस्य यांच्या घरासमोरच मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचे डबके साचत असल्याने या भागातून मार्गक्रमण करतांना अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

समस्यांनी नागरीक झाले त्रस्त
शहराचे उपनगर म्हणून ओळख असलेल्या कंडारी गावात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या, सांडपाण्याच्या गटारी तुंबणे, केरकचरा मानवी वसाहती भागातच टाकणे अशा विविध समस्यांनी नागरीक त्रस्त झाले आहेत.पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने गावातील विविध मार्गावर पाण्याचे डबके साचते. परीणामी नागरीकांना मार्गक्रमण करतांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत असल्याने ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. इतकेच नव्हेतर ग्रामपंचायत सदस्य डॉ.सुर्यभान पाटील यांच्या घरासमोरच पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात तुंबत असल्याने या मार्गावरून मार्गक्रमण करणे अवघड होवून जात आहे. यामुळे नागरीकांनी गावातील रस्त्याची समस्या मार्गी लावण्याची मागणी केली आहे.

केरकचर्‍याची अस्वच्छता
गावात केरकचर्‍याची समस्याही नागरीकांची डोकेदुखी ठरत आहे. गावातून संकलीत केला जाणारा केरकचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात असल्याने मानवी वसाहतीलगतच केरकचर्‍याचे ढिग निर्माण झाले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. याकडे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून कंडारी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत महामार्गावरील गोलाणी परीसर, सिद्धीविनायक कॉलनी, छायादेवी रांका नगर, अशा विविध विस्तारीत भागाचा समावेश होत आहे. ग्रामपंचायतीचा शासकीय करही मोठ्या प्रमाणात वसूल होतो मात्र ग्रामपंचायतीकडून कुठल्याही प्रकारे नागरीकांना मुलभूत सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.