भुसावळ । तालुक्यातील कंडारी येथे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी पुरवठ्याची समस्या उभी ठाकली आहे. गेल्या आठवडाभरापासून पाणी पुरवठा खंडीत झाल्यामुळे महिला- पुरुषांसह अबालवृध्दांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावाला लागून तापी नदी वाहत असताना देखील कृत्रिम पाणी टंचाईची समस्या कायम असल्याचे दिसून येते. विद्युत पंप जळाल्यामुळे पाणी पुरवठा खंडीत झाला असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या सुस्तावलेल्या कारभारामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नदी उशाला अन् कोरड घशाला अशी स्थिती याठिकाणी पहावयास मिळते, मात्र ग्रामपंचायत प्रशासनातर्फे नदी पात्रातील जलवाहिनी पुढे वाढविण्याचे काम सुरु असल्याचे कारण सांगण्यात येते. यास आठवडा उलटत असूनही काम पुर्ण होण्याचे नाव दिसत नाही, यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वर्षभराची समस्या
कंडारी गावात पाणी पुरवठ्याची समस्या हि नित्याचीच बाब झाली आहे. गावात शुध्द व पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वर्षभर भटकंती करावी लागत असते. पाणी पुरवठा केंद्रातील विद्युत पंप जळाले कारण सांगून पाणी पुरवठा खंडीत होत असतो. आठ- आठ दिवस उलटूनही हे पंप दुरुस्त होत नाही, याचा त्रास मात्र ग्रामस्थांना सहन करावा लागतो. गावात ग्रामपंचायततर्फे पर्यायी व्यवस्था म्हणून विहीरीवरुनही स्टॅण्ड पोस्टच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो.
विहिरीतून करावा लागतो पाणीपुरवठा
मात्र गावाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता केवळ एका विहीरीचे पाणी गावासाठी पुरेशे नाही, बर्याच वेळा या स्टॅण्ड पोस्टवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांमध्ये वादविवाद होत असतात. रागाच्या भरात काही ग्रामस्थांनी हे नळ तोडल्याचे प्रकारही वारंवार घडलेले आहेत. याबाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनासह पदाधिकार्यांनी गांभिर्यानी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
गेल्या आठवडाभरापासून गावात पाणी टंचाई असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यात काहींनी खाजगी विहरींवर विद्युत मोटारी बसवून आपला प्रश्न सोडवित आहे. तर काही नागरिकांना रेल्वेच्या एमओएच येथून पाणी आणावे लागते. घरात नियमित वापरासाठी पाणी नसल्यामुळे महिलांना नदीवर धुणे, भांडी करण्यासाठी जावे लागते. सध्या नदीची पाणी पातळी कमी झाल्यामुळे दूरवर खडक ओलांडून महिलांना डोक्यावर ओझे घेऊन ये- जा करावी लागत आहे.
ग्रामसेवकाअभावी कामे रखडली
याठिकाणी कायमस्वरुपी तसेच पुर्णवेळ ग्रामसेवक मिळत नसल्यामुळे कामांमध्ये अडचणी निर्माण होत असतात, दर सहा महिन्यानंतर नवीन ग्रामसेवक दिला जातो. या ग्रामसेवकांना इतरही गावांचा पदभार असल्यामुळे कंडारी ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे दुर्लक्ष होत असते. याचा परिणाम येथील कामांवर होऊन समस्या सुटत नाही. याअगोदर ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेच्या टंचाई आराखड्यातून गेल्या वर्षी दोन अतिरीक्त विद्युत पंप मिळाले आहे. या पंपांना पडून गंज लागत असूनही याचा वापर न केला जात नसल्याचे दिसून येते. हा पंप बसविण्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागते. मागील उन्हाळ्यात हे साहित्य मिळून देखील अद्यापही याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. केवळ ग्रामसेवकाअभावी याचा खर्च मंजूर होऊ शकत नसल्यामुळे या कामात देखील अडचणी येत असल्याचे शाखा अभियंता सुभाष लोखंडे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या देखभाल, दुरुस्ती खर्चातून कंडारी येथे नदीपात्रात गर्डर टाकण्याचे काम सुरु आहे. उन्हाळ्यात डबक्यातील पाणी घ्यावे लागते त्यामुळे जलवाहिनी पुढे वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यातून पाण्याची उचल करुन ती ग्रामपंचायतीच्या विहीरीत पाणी टाकले जाईल यामुळे उन्हाळ्यातही गावात पाणी टंचाईची समस्या कमी होऊ शकेल. याकामा पाणी पुरवठ्याशी काही संबंध नाही, काम सुरु असताना देखील पाणी पुरवठा होऊ शकतो. ग्रामपंचायतीचा पंप 15 दिवसांपासून जळाला आहे. त्यांनी पंप दुरुस्त केल्यास पाणी पुरवठा सुरळीत होईल.
– सुभाष लोखंडे, शाखा अभियंता, पंचायत समिती
याअगोदर पाणी पुरवठ्याचा पंप जळाला होता. तर सध्या
तापी नदी पात्रात पाण्याचा उपसा होत असलेल्या बंधार्यातून जलवाहिनी पुढे वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या चार्यांमध्ये गाळ अडकल्यामुळे पाण्याची उचल करताना अडचणी येतात. जलवाहिनीचे कामामुळे पाणी पुरवठा खंडीत झाला असून येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल.
– ए.डी. खैरनार, ग्रामसेवक, कंडारी