कंडारीत सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था,अस्वच्छतेचा निर्माण झाला प्रश्‍न

0

पंचायत समिती सदस्या यांच्या निवासस्थानाच्या काही अंतरावरच आहे शौचालय

भुसावळ- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानातंर्गत प्रत्येक गाव आणि घराघरात शौचालय उभारणीसाठी अभियान सुरू केले आहे.मात्र पंतप्रधान मोदी यांच्या अभियानाची केवळ कागदोपत्री अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत आहे.यामध्ये शहराचे उपनगर म्हणून ओळख असलेल्या कंडारी गावात खासगी शौचालयाचा अभाव असून सार्वजनिक शौचालयाचीही दुरावस्था झाल्याने या गावातील नागरीकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. शहराचे उपनगर असलेल्या कंडारी गावातील ग्रामपंचायत सदस्यांची संख्या 17 असून गावाची लोकसंख्या 18 हजारापर्यंत आहे.मात्र असे असूनही या गावात अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या असून नागरीकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.यामध्ये सर्वाधिक गावातील अस्वस्छतेचा प्रश्‍न निर्माण झाला असून नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.तसेच गावातील बहुतांश नागरीकांकडे खासगी जागा नसल्याने त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून रहीवास सुरू केला आहे.यामूळे अशा नागरीकांना घरकुल व वैयक्तीक शौचालयाचा लाभ मिळणे दुरापस्त झाले आहे.यावर मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायतीने सार्वजनिक शौचालय उभारले आहे.मात्र या सार्वजनिक शौचालयाची गत दिड ते दोन वर्षापासुन ग्रामपंचायतीचे देखभाल व दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने या शौचालयाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.परीणामी नागरीकांना उघड्यावर शौचास जावे लागत असल्याचा प्रकार निंदणीय असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.विशेष हे सार्वजनिक शौचालय पंचायत समिती सदस्या आशा मिसाळकर यांच्या निवासस्थानापासून अवघ्या काही अंतरावर आहे.

शौचालयाला काटेरी झुडपांचा वेढा
ग्रामपंचायतीच्या देखभाली अभावी सार्वजनिक शौचालयाच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.तसेच शौचालय व परीसराला काटेरी गवतांचा वेढा पडल्याने एकही पुरूष व महीला शौचालयाचा वापर करण्यास धजावत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.यामूळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला या गावात तिलांजली देण्यासारखा प्रकार दिसून येत असल्याने सुज्ञ नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

केवळ तिन कर्मचार्‍यांवर स्वच्छतेची मदार
कंडारी ग्रामपंचायत हद्दीचा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात विस्तार होत असून या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये महामार्गावरील विस्तारीत भागात छायादेवी राका नगर , सिद्धीविनायक कॉलनी, सहकारी औद्योगिक वसाहत अशा विविध भागांचा समावेश होतो.यामूळे ग्रामपंचायतीचे मासिक उत्पन्नही किमान तिन ते साडेतिन लाखापर्यंत वसुल होते.मात्र असे असूनही या गावात दहा कर्मचार्‍यांची आवश्यकता असतांना स्वच्छतेची मदार केवळ तिन कर्मचार्‍यांवर अवलंबून आहे. तेही रोजदांरीने काम करीत असल्याचे सांगण्यात आले.यामूळे गावातील व विस्तारीत भागातील स्वच्छतेचा प्रश्‍न मोठा जटील बनत आहे.याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

गुड मार्निंग पथकही झाले होते हतबल
गावात जागेअभावीी बहुतांश नागरीकांकडे वैयक्तीक शौचालय नसल्याने अनेक पुरूष व महीलांना उघड्यावर शौचास जावे लागते. हा प्रकार बंद करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावे हगणदारी मुक्त करण्यासाठी गुड मार्निंग पथकाची स्थापना करून तालुक्यातील प्रत्येक गावात जावून उघड्यावर शौचास बसणार्‍या व्यक्तींचा गुलाबपुष्प देवून सत्काराची मोहीम राबवली होती.याच प्रकारे हे पथक कंडारी गावात गेले असता तेथील उघड्यावर शौचास बसणार्‍या एका व्यक्तीचा सत्कार केला असता त्याने माझे कडे जागा नसल्याने शौचालय बांधू कुठे असा प्रश्‍न पथकाला केला.यामूळे गुड मार्निंग पथकही हतबल झाले होते.

सांडपाण्याच्या गटारीही तुंबल्या
गावात स्वच्छता कर्मचार्‍यांची तोडकी संख्या व ग्रामपंचायत प्रशासनाचा नियोजनाचा अभाव यामूळे गावातील सांडपाण्याच्या गटारी सांडपाण्याने मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत.यामूळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.मात्र पंचायत समितीस्तरावरील वरीष्ठ अधिकार्‍यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ग्रामविकास अधिकारीही टिकेना
कंडारी ग्रामपंचायत हद्दीचा मोठ्या प्रमाणात नागरी वसाहतीमध्ये विस्तार झाला आहे.यामूळे या ग्रामंपचायतीचे बर्‍यापैकी उत्पन्न आहे.मात्र असे असूनही गावातील राजकीय खेळीमूळे या ग्रामपंचायतीमध्ये एकही ग्रामविकास अधिकारी जास्त दिवस टिकत नसल्याने गावातील विकास कामांना खिळ बसत असल्याची चर्चा सुज्ञ नागरीकांमध्ये होत आहे.याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याची मागणी नागरीकांमधून होत आहे.