कंडारीत 24 तासात सहा जणांच्या मृत्यूने हळहळ

0

एकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय ; ग्रामस्थांमध्ये हळहळ

भुसावळ- तालुक्यातील कंडारी येथे तब्बल सहा जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. सहा मयतांमध्ये चार पुरूषांसह एका महिलेचा समावेश असून त्यातील एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय आहे. गावात प्रथमच 24 तासात अंतरा-अंतराने सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे जाणकारांनी सांगितले.

वृद्धेचा उष्माघाताने मृत्यू
कंडारी गावातील परदेशीवाडा भागातील सायराबाई शेख गफूर पिंजारी (65) यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. धुणीभांडीचे काम करून उदरनिर्वाह करणार्‍या सायराबाई यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय आहे. त्यांच्या पश्‍चात तीन मुली, मुलगा असा परीवार आहे.

पाच जणांचा 24 तासात मृत्यू
गावातील महादेव मंदिराचे ट्रस्टी काशीराम जयराम महाजन (75, महाजनवाडा, कंडारी) यांचे मंगळवारी सकाळी 11 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पत्नी, पश्‍चात चार मुले असा परीवार आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दुसर्‍या घटनेत रामा वामन भालेराव (75, बौद्धवाडा, कंडारी) हे आजारी असतानाच सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. तिसर्‍या घटनेत कॅन्सरने पीडीत असलेल्या उत्तम नारायण तायडे (34, महादेव टेकडी, कंडारी) यांचेही सोमवारी रात्री निधन झाले. तायडे यांच्या मुलाने वडिलांना वाचवण्यासाठी पैसे जमा केले होते शिवाय आई प्रतिष्ठाननेही मदतीचा हात दिला होता मात्र वीटभट्टीवर हातमजूर असलेल्या तायडे यांचीही प्राणज्योत मालवली. चौथ्या घटनेत हरीसिंग चिंतामण पाटील (60, ग्रामपंचायतीजवळ, कंडारी) यांचे सोमवारी रात्री आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुले असा परीवार आहे तर पाचव्या घटनेत सोमवारी रात्री मिराबाई डोंगरसिंग पाटील (65, राजपूतपुडा, कंडारी) यांचेही निधन झाले. दरम्यान, पाचही जणांवर बुधवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तर काशीराम महाजन यांच्यावर बुधवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गावातच प्रथमच एकाचवेळी सहा जणांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.