तालुक्यातील दोन गावांना आरोग्य विभागाचे पिवळे कार्ड
भुसावळ- तालुक्यातील गावांमधून आरोग्य विभागाने पाणीपुरवठा होणार्या जलस्त्रोतांचे नमूने रासायनिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. यामध्ये कंडारी व सावतर या गावांमध्ये अल्पशा प्रमाणात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यानुसार तालुका आरोग्य विभागाने या दोन गावांना पिवळे कार्ड देवून उपाययोजना करण्याची सूचना केली आहे.
उपाययोजना करण्याबाबत आरोग्य विभागाचे पत्र
आरोग्य विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावातील पाणीपुरवठा होणार्या जलस्त्रोतांमधील पाण्याचे नमुने संकलीत करून रासायनिक तपासणीसाठी जिल्हा पातळीवरील प्रयोगशाळेत पाठवले जातात. त्यानुसार तालुक्यातील कंडारी व सावतर निंभोरा या दोन गावांमधील जलस्त्रोतांचे नमूने तपासणीसाठी पाठवले असता या गावांमध्ये अशुद्ध स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याचे अहवालातून समोर आले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने या दोन गावांना पिवळेकार्ड देवून जलशुद्धीकरणाबाबत उपाययोजना करण्याचे पत्र दिले आहे.
या दोन गावांनी केली उपाययोजना
तालुक्यातील कठोरा व जाडगाव या दोन गावांमध्ये गत महिन्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला होता.त्यानुसार आरोग्य विभागाने तातडीने पत्रव्यवहार करून ग्रामपंचायतीला उपाययोजना करण्याची सुचना दिली होती.याची ग्रामपंचायतीने दखल घेवून उपाय योजना केल्याने सद्यस्थितीत या दोन्ही गावांतील पाणीपुरवठा शुद्ध स्वरूपाचा होत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
असे असते आरोग्य विभागाचे कार्ड
तालुक्यातील प्रत्येक गावातील जलस्त्रोतांचे आरोग्य सेवकाकडून पाण्याचे नमुने दरमहा संकलीत केले जातात. संकलीत केलेले पाण्याचे नमुने रासायनिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात.प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानुसार जास्त दुषीत पाणीपुरवठा होणार्या गावांना रेडकार्ड,अल्पशा प्रमाणात दुषीत पाणीपुरवठा होणार्या गावांना पिवळेकार्ड तर शुद्ध स्वरूपाचा पाणीपुरवठा होणार्या गावांना ग्रीनकार्ड या प्रमाणे देवून ग्रामपंचायतीला उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची सुचना दिली जाते.
ग्रामपंचायतीने दखल घेण्याची आवश्यकता
गावात अशुद्ध स्वरूपाचा पाणीपुरवठा झाल्यास नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. याचप्रकारे यावल तालुक्यातील साकळी येथे अशुद्ध स्वरूपाचा पाणीपुरवठा झाल्याने या गावातील एका बालिकेला आपले प्राण गमवावे लागले आहे. या पार्श्वभुमीवर ग्रामपंचायतीने आपापल्या गावातील जलवाहिनीला लागलेली गळती व स्वच्छतेकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात हा धोका उद्भवू शकतो.