कंडारी येथे पक्ष्यांंसाठी घरट्यांचे वितरण

0

भुसावळ। उन्हाळ्यात पक्षांना निवारा आणि पाणी मिळत नसल्यामुळे उन्हाच्या तीव्रतेने पक्षांना जीव गमवावा लागत असतो. त्यामुळे या पक्षांचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी तालुक्यातील कंडारी येथील जागृतीचा राजा फाऊंडेशनतर्फे टाकऊ वस्तूंपासून घरटे बनवून त्यांचे नागरिकांना मोफत वितरण करण्यात आले. सध्या उन्हाळा सुरु झाला असून दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. तसेच झाडांची पानगळ देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे पक्षांची घरटी उघडी पडतात नाईलाजाने त्यांना राहण्यास निवारा मिळत नाही. तसेच पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत देखील आटत असल्यामुळे पक्षांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, परिणामी पक्षांना आपला जीव गमवावा लागत असतो.

टाकाऊ वस्तूंपासून घरटे, जलपात्राची निर्मिती
पक्षांची दिवसेंदिवस घटते प्रमाण हे चिंताजनक बाब असून यासाठी कंडारी येथील जागृतीचा राजा फाऊंडेशनतर्फे उपक्रम राबविण्यात येत आहे. घरात टाकाऊ वस्तू फेकल्या जातात मात्र या टाकाऊ वस्तूंचे संकलन करुन त्यांचा चांगल्या कामासाठी वापर करीत पक्षांचे घरटे व जलपात्र बनविण्यात आले. यानंतर फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी गावातील झाडे, शाळा परिसरात हि घरटे बसविण्यात आली तसेच ग्रामस्थांना देखील या घरट्यांचे मोफत वितरण करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.