कंडारी वृक्षारोपणाचा फलकच रेल्वे विभागाने काढला

0

निरूत्साही अधिकार्‍यांमुळे वृक्षारोपण कागदावरच : रेल्वे उद्यानाचा विकासाची अपेक्षा

भुसावळ- शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीवर भर दिला जात आहे मात्र शासनाच्या विविध विभागाकडूनच वृक्ष लागवड केवळ कागदोपत्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामध्ये रेल्वेच्या इंजिनिअरींग विभागाने सुद्धा कंडारी क्षेत्रात आरक्षीत केलेल्या जागेवर वृक्षारोपण असा फलक लावला होता तसेच या जागेला तारेचे कुंपणही केले होते. प्रत्यक्षात मात्र या जागेवर आतापर्यंत एकाही वृक्षाची लागवड केली नसल्याचे वृत्त ‘दैनिक जनशक्ती’ने 31 ऑगष्टच्या अंकात सचित्र वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेवून रेल्वे प्रशासनाने वृक्षारोपणाचा फलकच जागेवरून टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

रेल्वे प्रशासनाचे कागदोपत्री वृक्षारोपण
शासनाच्या माध्यमातून देशभरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्यानुसार जुलै महिन्यात सर्व शासकीय, निमशासकीय, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्थांना वृक्षारोपणाचे आवाहन केले जाते तसेच विविध शासकीय विभागांना वृक्षरोपणाचे उद्दिष्ट दिले जाते. यामुळे विविध शासकीय विभागाचे अधिकारी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी काही भागात वृक्षारोपण करून त्याचे फोटोसेशन करून संबधीत विभागाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना पाठवुन देतात. यानंतर मात्र वृक्षारोपण केलेल्या रोपांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. असाच प्रकार रेल्वे विभागात सुरू असल्याचे समोर आले आहे. रेल्वेच्या इंजिनिअरींग विभागाने गत काही वर्षापासून कंडारी क्षेत्रात वृक्षारोपणासाठी जागा आरक्षीत करून त्या जागेवर इंजिनिअरींग विभाग कंडारी, क्षेत्र वृक्षारोपण असा फलक लावून या जागेला तारेचे संरक्षण कुंपण केले होते मात्र प्रत्यक्षात या जागेवर कुठल्याही प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले नसल्याचे वृत्त ‘दैनिक जनशक्ती’ने प्रसिद्ध करताच रेल्वे विभागाने आरक्षीत जागेवरील फलकच काढून टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आरक्षीत जागेला काटेरी झुडूपांचा वेढा
रेल्वेच्या इंजिनिअरींग विभागाने आरक्षीत केलेल्या जागेवर वृक्षरोपण करण्यात आले नसल्याने या जागेला काटेरी झाडा-झुडुपांचा वेढा पडला आहे तसेच आरक्षीत जागेवर परीसरात केरकचरा टाकला जात असल्याने मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे परीसरात दुर्गंधीमय वातावरण निर्माण झाल्याने नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

वृक्षारोपण होते केवळ कागदोपत्री
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शासकीय विभागांना देण्यात वृक्षरोपणाचे उद्दीष्ट केवळ कागदोपत्री होत असल्याचे दिसून येत आहे. जुलै महिन्यात विविध शासकीय विभागाने केलेले वृक्षारोपण देखभाल व संरक्षणाअभावी दिसेनासी झाली आहेततर या वृक्षरोपण कार्यक्रमाचे फोटोसेशन मात्र अधिकार्‍यांच्या दप्तरी जपून ठेवण्यात आले आहेत. याकडेही प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

रेल्वे प्रशासनाचे उद्यानेही पडली धूळखात
रेल्वे प्रशासनाने आरपीडी रोडवर आपल्या हद्दीत नाना-नानी व त्याच्या लगतच एक असे दोन उद्याने उभारली आहेत मात्र या उद्यानाकडेही रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ही उद्याने वापराविना धुळखात पडली आहेत. यामुळे रेल्वे कर्मचार्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.याची रेल्वे प्रशासनाने दखल घेवून या उद्यानाचे पुन्हा सुशोभीकरण करावे, अशी मागणी होत आहे.