कंडारी सरपंचांसह नऊ सदस्यांवर अपात्रतेची कारवाई

0

भुसावळ । तालुक्यातील कंडारी येथील नवनियुक्त सरपंच, उपसरपंच यांंसह ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र 6 महिन्यांच्या मुदतीत दाखल केले नसल्याने या 10 सदस्यांवर जिल्हाधिकार्‍यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. कंडारी ग्रामपंचायतीच्या 2015 मधील सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र 6 महिन्यांच्या मुदतीत दाखल करणे नियमानुसार आवश्यक आहे. मात्र सदर सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्याने धनराज मगर यांनी यासंदर्भात तहसिलदारांकडे तक्रार केेली हेाती. त्यानंतर हे प्रकरण जिल्हाधिकार्‍यांकडे आले असता दोन्ही बाजुंकडील युक्तिवाद ऐकून तसेच परिस्थितीची पाहणी करुन अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी यातील सदस्यांना पुढे चालू राहण्यास अनर्ह ठरविण्यात आले आहे.

कारवाईत यांचा आहे सहभाग
या कारवाईत निवडणूक निर्णय अधिकारी अनिल सुरळकर, सदस्य मुस्तफा मुसा सैय्यद, सरपंच योगिता शिंगारे, उपसरपंच रुपाली दुसाने, सदस्या भारती लोखंडे, यशवंत मोरे, अनिता इंगळे, मनिषा बिर्‍हाडे, सविता मोरे, राम जाधव यांचा समावेश आहे. दरम्यान, हे सर्व सदस्य अपात्र झाल्यामुळे कंडारी गावासह तालुक्यातील राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.