जळगाव: भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेतील अवसायक काळात झालेल्या गैरव्यवहाराची पाळेमुळे उखडण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी आवाज उठविला आहे. या गैरव्यवहारात अवसायक जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवर हे दोघी केवळ प्यादे असुन म्होरक्या दुसराच असल्याचा संशय डॉ. सतीश पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान हे प्रकरण दडपण्यासाठी खा. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी बारामती गेलेल्या ‘त्या’ नेत्याचा शोध घेणार असल्याचेही डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी पुढे बोलतांना सांगितले की, बीएचआर पतसंस्थेत करोडो रूपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. काहींनी कर्ज घेऊन त्याचा दुरूपयोग केला. ज्यांनी हे पाप केले आहे त्यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. कोट्यावधी रूपयांचा गैरव्यवहार करणार अवासायक आणि त्याचा हस्तक सुनील झवर अजूनपर्यंत कसा सापडत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
बारामतीला जाण्यार्याचा शोध घेणार
बीएचआर हे प्रकरण दडपण्यासाठी एक नेता बारामतीला खा. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. दरम्यान बारामतीला कोण नेता गेला याचा शोध घेणार असल्याचेही माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माझा नेता शरद पवारच
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीच्या पहिल्याच बैठकीत माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या फोटोवरून नाराजीनाट्य झाले होते. यासंदर्भात बोलतांना डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले की, पक्षाची जाहीरात असती आणि त्यात फोटो नसता तर मी आक्षेप घेतला असता. पण कुणी दोन कार्यकर्त्यांनी फोटो टाकला नाही हा विषय मोठा नाही. ज्यांना माझा चेहरा आवडेल ते माझे फोटो टाकतील. काहीही झाले तरी या पक्षात माझा नेता हा शरद पवारच असल्याचे डॉ. सतीश पाटील यांनी स्पष्ट केले.