नवी मुंबई । समाज समता कामगार संघाच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कामगारांनी किमान वेतनाची लढाई जिंकली असली तरी कायम होणे व समान वेतनाची आणि ऐरियसची लढाई अजुन बाकी आहे. त्यामुळे या लढाईसाठी पुन्हा एकदा समता कामगार संघाने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.सोमवारी पालिका मुख्यालयावर धडक देत बेमुदत सामुहीक रजा आंदोलनाने याची सुरुवात होणार आहे. गेली 21 वर्षांपासून आपल्या कामगारांचे शोषण करणार्या ठेकेदारांच्या दलालांना (सुपरवायझर) यांना त्यांची जागा दाखवून त्यांच्या हातात झाडू देण्यासाठी हजारोंच्या संख्येने सामील व्हा, असे भावनिक आव्हानही त्यांनी केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व कामगारांना 19.05.2017 रोजी महासभेने मंजूर केलेल्या ठरावानुसार 24.02.2015 रोजी पासुनच्या वेतनातील थकित फरकाची रक्कम व उर्वरित विभागातील कामगारांना श्रेणी निहाय किमान वेतन त्वरित मिळावे.
नवी मुबंई महानगरपालिकेतील सर्व कामगारांना रजा रोखीकरणाची रक्कम व बोनसची रक्कम श्रेणी निहाय सुधारीत दराने म्हणजेच अकुशल कामगारांना रजा रोखीकरणाची रक्कम साधारण12012 व बोनसचे 14292 एकूण 26304 रूपये प्रमाणे मिळावे. घन कचरा व्यवस्थापन विभागाने काढलेल्या परिपत्रकामध्ये कामगारांच्या 4 टक्के गॅ्रज्युटीची रक्कम दरमहा 572 रूपये व 1 टक्के रजेचा पगार दरमहा 143 रूपयांचा समावेश करून एकुण रकमेमध्ये 715 रूपयांची वाढ करावी. घन कचरा व्यवस्थापन अंर्तगत सुपरवायझर हे पदच नसल्यामुळे बेकायदेशीर 240 सुपरवायझरांना त्यांच्या मूळ पदावर म्हणजेच सफाई कामगार नेमण्यात यावे.
रणशिंग फुंकण्याचे कारण
काही असंतोषी लोकांनी युनियनचा धंदा करण्यासाठी नविन दुकाने मांडून पुढे आले आहेत. तर काही असंतुष्ट लोकं पुन्हा त्याच युनियनचा आधार घेत आहेत. ज्यांनी 2003 साली 6500 कामगारांच संसार उध्वस्त केले आणि स्वतःच्या झोळया भरल्या अशा सर्वांविरोधात उभे राहुन पुन्हा सर्वांनी लढाईसाठी सज्ज व्हा. कारण ही लढाई शेवटपर्यंत आपणच लढणार आणि जिंकणार आहोत असे आव्हान करत समता कामगार संघाचे सचिव मंगेश लाड यांनी सोमवारपासून आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.