कंत्राटी कामगारांचा आवाज बुलंद करणार- विजय पाळेकर

0

१७५ कंत्राटी कामगार झाले कायम

चाकण-कंत्राटी कामगारांबाबत सरकारची असलेली अनास्था व तोकडे कामगार कायदे यामुळे कंत्राटी कामागारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या कंत्राटी कामगारांचा आवाज यापुढील काळात बुलंद करण्याकरिता शिवक्रांती कामगार संघटना काम करणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस अ‍ॅड. विजय पाळेकर यांनी सांगितले. चाकण एमआयडीसीमधील केलेबीन इंडिया प्रा. लि. या कंपनीमधील १७५ कंत्राटी कामागारांना शिवक्रांती कामगार संघटनेच्या प्रयत्नांतून कायम करण्यात आले.

शिवक्रांती कामगार संघटनेचे सभासदत्व

चार ते पाच महिन्यांपूर्वी या कामगारांनी शिवक्रांती कामगार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले होते. मागील काही दिवसांपासून संघटना व कंपनी प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्यानंतर या कामगारांना कायम करण्याचा सकारात्मक निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला. नुकतेच या कामागारांना कायम केल्याची पत्रे वाटप करण्यात आली. यावेळी कंपनी व्यवस्थापनाचे विरेंद्र जाम, रोहिदास गोरडे, शिंपी संघटनेचे सरचिटणीस विजय पाळेकर, गुलाबराव मराठे, रविंद्र साठे, राजेंद्र पवार, रोहन आहेर, हनुमंत कलाटे हे उपस्थित होते.

कायद्यात बदल होणे गरजेचे
यावेळी बोलताना विजय पाळेकर म्हणाले की, कामगार क्षेत्रात सध्या कंत्राटी कामगारांच्या समस्या मोठ्या आहेत. मात्र, त्यांच्याबाबत सरकारची धोरणे उदासीन आहेत. तसेच कामगार कायद्यात बदल होणे गरजेचे आहे. या शिवाय या समस्या सुटणे अशक्य असल्याने या पुढील काळात कंत्राटी कामगारांचा आवाज बुंलद करण्यासाठी शिवक्रांती कामगार संघटना काम करेल.