कंत्राटी कामगारांचा ’पीएफ’ न भरणार्‍या संस्थेच्या अध्यक्षावर गुन्हा

0

पिंपरी-चिंचवड : कंत्राटी कामगारांची भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम त्यांच्या खात्यात न भरणार्‍या मेसर्स देव स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह दोघांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संस्थेचे अध्यक्ष सचिन पंढरीनाथ काळे (वय 42) आणि संस्थेचे प्रतिनिधी अशोक थोरात (दोघे रा. चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2015 मध्ये निविदा प्रक्रिया
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यलयाच्या हद्दीतील रस्ते आणि गटार साफसफाईचे काम खासगी ठेकेदारांकडून करून घेण्यासाठी 2015 मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामध्ये पात्र ठरलेल्या मेसर्स देव स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला हे काम मिळाले. या ठेकेदार संस्थेने या कामासाठी 12 कंत्राटी कामगार पुरवावेत, असे आदेश महापालिकेने दिले. त्याबाबतचा करारनामा संस्थेचे अध्यक्ष सचिन पंढरीनाथ काळे यांच्यासोबत महापालिकेने केला आहे.

पाच लाख 29 हजारांचा गैरव्यवहार
या ठेकेदार संस्थेचे प्रतिनिधी म्हणून अशोक थोरात हे कामकाज पाहत आहेत. महापालिकेने केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार कंत्राटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम ठेकेदार संस्थेला अदा केली आहे. महापालिकेने दिलेली रक्कम आणि कामगारांची नियमानुसार ठेकेदाराने भरावयाची रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे संस्थेने जमा करणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु, काळे व थोरात यांनी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचे पाच लाख 29 हजार 658 रुपये त्यांच्या खात्यात न भरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरून अपहार केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.