कंत्राटी कामगारांचे कामबंद

0

भुसावळ । महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी – बाह्यस्त्रोत कर्मचार्‍यांच्या जीवनावश्यक मागण्यांकरीता सोमवार 22 रोजीपासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात औष्णिक विद्युत प्रकल्पातील सर्व संघटना प्रकल्पातील सर्व विभागातील कामगारांनी सहभाग नोंदविला आहे. यावेळी 2 हजार कंत्राटी कामगार आंदोलनात सहभागी झाले होते. प्रकल्पाच्या गेट समोर कर्मचार्‍यांतर्फे निदर्शने करण्यात आली. गेली चार वर्षे कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांकरीता कृती समितीतील संघटनांनी पाठपुरावा केला. रानडे कमेटीनंतर अनुराधा भाटीया कमेटीसमोर संघटनांनी सर्व पुरावे सादर केल्यानंतरही निर्णय झाला नाही. त्यामुळे राज्यव्यापी पातळीवर तिन्ही कंपन्यातील कंत्राटी कर्मचारी, सुरक्षा रक्षक व बाह्यस्त्रोत कर्मचार्‍यांनी 100 टक्के बंद यशस्वी केला.

यांचा होता सहभाग
या आंदोलनात कमलेश राणे, धनंजय चौधरी, गणपती मंदिर गेटसमोर सचिन भावसार, कैलास नेमाडे, शक्तीगड गेट समोर विक्रम चौधरी, दिपक अडकमोल, गजानन चराटे, केसरसिंग पाटील, सचिन ठाकूर, यांनी नेतृत्व केले. यशस्वीतेसाठी भुषण लढे, रवि हरणकर, संजय रोटे, संजय सोनवणे, महेंद्र तायडे, महेंद्र नेहेते, संजय सुर्यवंशी, रवि महाजन, यतिन केदारे, नचिकेत मोरे, सुनिल ठाकूर, चंद्रा अवस्ती यांसह कंत्राटी कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या आंदोलनास राष्ट्रीय मजदूर सेनेने आपला पाठींबा दर्शविला असून प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी कर्मचार्‍यांची भेट घेतली.

या आहेत कृती समितीच्या मागण्या
कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगार संयुक्त कृती समितीतर्फे करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये सर्व कंत्राटी- बाह्यस्त्रोत कामगारांना जेष्ठतेनुसार कायम करा, समान काम समान वेतन धोरण लागू करावे, कायम करेपर्यंत रोजंदार कामगार पध्दत सुरु करण्यात यावी, राजगाराची हमी देऊन जेष्ठता यादी जाहीर करण्यात यावी, परिपत्रकांचे पालन न करणार्‍या कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे.

रास्ता रोको करणार
कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसदर्भात मजदूर सेनेतर्फे मंगळवार 23 रोजी दीपनगर सरगम गेट समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जगन सोनवणे, हरिष सुरवाडे, सुनिल ठाकूर, दिलीप दाभाडे, दिपक अडकमोल, सुनिल राजपूत, प्रल्हाद गायकवाड, अजय कोळी यांनी केले आहे. तर आरपीआय गवई गटातर्फे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी हे देखील मंगळवार 23 रोजी जिल्हाधिकारी निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांसदर्भात निवेदन देणार आहे.