भुसावळ। दिपनगर विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 22 रोजीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाची दखल वरिष्ठ पातळीवरुन घेण्यात येवून आंदोलक कामगारांची मध्यस्थी करण्यासाठी मुंबईहून मुख्य अभियंता अभय हरणे यांना पाठविण्यात आले होते. हरणे यांच्या उपस्थितीत अधिकारी आणि कंत्राटी कामगार संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत बैठक घेण्यात आली. यात काही मागण्यांवर तडजोेड करण्यात आली. मात्र काही मागण्यांवर तोडगा न निघाल्याने मागण्या पूर्ण होईपर्यंत कर्मचार्यांचा संप कायम राहणार असल्याचे संघटनेच्या वतीने जाहिर करण्यात आले.
संप मागे घेण्याचे आवाहन
या बैठकीत मुख्य अभियंता माधव कोठुळे, उपविभागीय पोलीस अधिक्षक निलोत्पल यांसह कामगार संघटनेचे जगन सोनवणे, अरुण दामोदर, विक्रम चौधरी, हरिष सुरवाडे, दिपक अडकमोल, गजानन चर्हाटे, सुनिल ठाकुर, विजय भावसार उपस्थित होते. या बैठकीत मजदूर सेनेतर्फे आपल्या मागण्या सादर करण्यात आल्या. त्यामध्ये कर्मचार्यांना सात हजार रुपये बोनस, कामावर ओळखपत्र, राहण्यासाठी क्वॉर्टर आदी मागण्या मांडल्या. यावर अभय हरणे यांनी वरिष्ठ पातळीवरुन पगारवाढ तसेच कंत्राटी कामगारांना कायम करणे व त्यांच्या इतरही मागण्यांवर सकारात्मक चर्चा सुरु असल्याचे सांगितले व कामगारांनी हा संप मागे घ्यावा आणि वीज निर्मिती करण्यास सहकार्य करण्याचे आवाहनही हरणे यांनी केले.