खडकी । संरक्षण क्षेत्रातील इतर सर्वसामान्य कामगारांप्रमाणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील कंत्राटी कामगारांना समान काम, समान वेतनपद्धत लागू करावी यांसह अनेक समस्या व प्रलंबित मागण्यांबाबतचे लेखी निवेदन कॅन्टोन्मेंट बोर्ड मजदूर संघाचे राष्ट्रीय प्रभारी दीपक कुलकर्णी यांच्या वतीने नुकतेच संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना देण्यात आले.कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त भामरे नुकतेच पुणे दौर्यावर आले होते. त्यावेळी भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्ड मजदूर संघाचे राष्ट्रीय प्रभारी कुलकर्णी यांनी भामरे यांची भेट घेऊन कंत्राटी पद्धतीने काम करणार्या कामगारांच्या समस्या व प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करून मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी संघाचे संजय कांबळे उपस्थित होते.
देशातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्डात कंत्राटीपद्धतीने नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी यांची अतिशय पिळवणूक होत असल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला असून त्यांच्या न्याय मागणी संदर्भात संघटना लढा देणार आहे. भामरे यांची भेट घेऊन यासंबंधी लक्ष घालून तातडीने कंत्राटी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबतची मागणी यावेळी करण्यात आली. कंत्राटी कामगारांना आरोग्य संदर्भातील सीजीएचएस ही सुविधा कामगारांना लागू करावी. कॅन्टीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. या कर्मचार्यांना ओळखपत्र व वेतन पावती दिली जावी. सफाई कामगार आयोगानुसार वैद्यकीय सुविधा दिली जावी. गणवेश व शैक्षणिक भत्ता दिला जावा तसेच कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा अशा मागण्यांबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने यावेळी भामरे यांना देण्यात आले. मागण्यांबाबत अभ्यास करून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे भामरे यांनी यावेळी आश्वासन दिले.