भुसावळ। औष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांना सात हजार रुपये बोनस देण्याबाबतचा आदेश शासनाने काढूनही केवळ 3 हजार 500 बोनस देण्यात आला होता. आदेशाप्रमाणे पूर्ण बोनस द्यावा यासाठी वीज व्यवस्थापनाकडे वारंवार मागणी करुनही बोनस मिळत नव्हता. याबाबत मुख्य अभियंता यांच्यासोबत झालेल्या कृती समितीच्या बैठकीत बोनस देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
संघटनेच्या विविध मागण्यांची पुर्तता करणार
येथील कंत्राटी कामगारांच्या गेट पासवर महानिर्मितीचा शिक्का लावण्यात चालढकल केली जात होती. याबाबत व्यवस्थापनाला तांत्रिक अडचणी कंत्राटी कामगारांना कशा येवू शकतात याबाबत सविस्तर सांगितल्यानंतर मुख्य अभियंता हरणे यांनी गेट पासवर शिक्का देण्याबाबत सक्तीचे आदेश देण्यात येतील, असे स्पष्ट केले. युनिट चार आणि पाच येथे कामगारांना हजेरी लावतांना टाईम ऑफिससमोर मोठी गर्दी होत असल्याने बायोमॅट्रिक हजेरी लावतांना अडचणी येतात. याबाबत सांगितले असता त्याठिकाणी दोन मशिन लावण्याच्या सुचना दिल्या. कंंत्राटी कामगारांना वसाहतीत रिक्त गाळे काही अटीवर मिळण्याबाबत व्यवस्थापनाला कंत्राटी कामगारांच्या राहण्याच्या अडचणी निदर्शनास आणून दिल्यावर काही अटीनंतर गाळा देण्याबाबत निर्णय घेवू असे आश्वासनही मुख्य अभियंत्यांनी दिले. यावेळी कामगार नेते अरुण दामोदर, कृती समिती पदाधिकारी सुनिल ठाकुर, झोपे, दिपक अडकमोल, राजकुमार वैद्य आदी कामगार उपस्थित होते.